पुणे : जळगावच्या परधाडे रेल्वे स्टेशनच्या जवळ बुधवारी रेल्वे दुर्घटना झाल्यानं एकच खळबळ उडाली. जळगावहून मुंबईला निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेनं अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. पण, दुर्दैवाने समोरून येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवल्यानं त्यांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
जखमींचा शासकीय खर्चाने उपचार करणार : जळगाव पाचोरा दरम्यान असलेल्या परधाडे गावाजवळ भीषण रेल्वे दुर्घटना घडली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालची घटना घडल्यावर मुख्यमंत्री तसंच एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनीही एक्स पोस्ट केल्याची माहिती दिली. सरकारच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजनदेखील स्पॉटवर गेले होते आणि तत्काळ कामाला सुरुवात केल्याचं सांगितलं. ही अतिशय दुर्दैवी घटना निव्वळ अफवामुळे घडली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचीही माहितीही त्यांनी दिली.
कशी घडली घटना? : "या घटनेची माहिती घेतल्यावर असं लक्षात आलं की, उदल कुमार हा तीस वर्षीय तरूण उत्तरप्रदेश येथील रहिवाशी आहे. उदल कुमार हा लखनऊ ते मुंबई पुष्पक एक्स्प्रेसने नऊ वाजून २५ मिनिटांनी मुंबई येथे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्यासाठी येत होता. त्याच्यासोबत त्याच्या पत्नीचे भाऊ विजय कुमार होते. हे दोघे सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीत वरच्या आसनावर बसले होते. तेव्हा रेल्वेच्या चहावाल्याने आग लागली, अशी ओरड केली आणि ती ओरड यांना ऐकू आली. बोगीत गोंधळ उडाला तेव्हा प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गाडीतून दोन्ही बाजूंनी उड्या मारल्या. तसेच रेल्वे वेगात असताना एकाने रेल्वेची चैन ओढली आणि रेल्वे थांबवली. तेव्हा देखील ज्यांना जसं वाटलं त्या पद्धतीने लोक खाली उतरले. तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जाणारी कर्नाटक एक्स्प्रेस अतिशय वेगाने आली आणि प्रवाश्यांना धडक देत पुढे थांबली. यात अनेक प्रवाशी जखमी झाले तर काही मृत्यूमुखी पडले. या घटनेत १३ जण मृत्युमुखी पडले आहेत. ज्यात १० लोकांची ओळख पटली आहे" अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
गुलेन बॅरी सिंड्रोम आजार संसर्गजन्य नाही : यावेळी अजित पवार यांना गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "सिंड्रोम या आजाराचा आढावा घेतला आहे. हा आजार संसर्गजन्य रोग नाही. कलेक्टर, सीईओ आणि सर्व आधिकार्यांना सांगितलं आहे की, याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. याबाबत नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे. जी संख्या ३० होती ती आत्ता ५९ वर गेली आहे. बहुतेक लोक हे पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत."
हेही वाचा -
- जळगाव रेल्वे अपघात: मृतांचा आकडा वाढला, मृत प्रवाशांची नावं आली समोर, नेपाळमधील 'इतक्या' प्रवाशांचा समावेश
- जळगाव रेल्वे अपघातात किमान १२ ठार, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी एका रेल्वेतून मारल्या उड्या, दुसऱ्या रेल्वेने चिरडलं
- आगीच्या अफवेनंतर पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी मारल्या उड्या, बंगळुरू एक्स्प्रेसनं 11 जणांना चिरडलं