मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तर महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेवरील पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे. "मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मतदारांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना याधीही लढत होती आणि यापुढेही लढत राहील, हे मतदारांच्या मनात ठसवा, मनात रुजवा," असं आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरेंनी केलं आहे. आज (3 डिसेंबर) शिवसेना (उबाठा) पक्षाच्या माजी नगरसेवकांची मातोश्री येथे बैठक पार पडली. यावेळी त्यांना माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना वरील सूचना केल्या.
हिंदुत्वाचा मुद्दा रुजवा :मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. "महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. शिवसेना हिंदुत्वासाठी यापूर्वीही लढत होती आणि यापुढेही लढत राहणार, हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करा, मनात रुजवा. आपल्या पक्षानं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य रीतीनं प्रतिवाद करा," अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक सध्या शिंदे सेनेच्या गोटात गेले असले, तरी उरलेल्या माजी नगरसेवकांसह नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मातोश्री येथे बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना भावनिक साद घातली आहे.