सातारा - कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली गावच्या हद्दीत रेल्वे गेट क्र. ९७ वर बुधवारी पहाटे मोठा आवाज झाला. पुण्याहून मिरजकडे निघालेल्या गांधीधाम-बंगळुरू एक्सप्रेसला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याचा संदेश गेटमनने कराड रेल्वे स्टेशन मास्तरांना दिला. संदेश मिळताच रेल्वे यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत आल्यामुळं स्थानिकांची झोप उडाली.
पहाटे रेल्वे गेटवर झाला मोठा आवाज - पुणे-मिरज लोहमार्गावर कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील रेल्वे गेट क्रमांक ९७ वर बुधवारी पहाटे मोठा आवाज झाला. गांधीधाम-बंगळुरू एक्सप्रेसला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याची माहिती गेटमन नरेंद्र मीना यांनी कराड रेल्वे स्टेशन मास्तर अमरिश कुमार यांना दिली होती. त्यामुळे काही वेळातच रेल्वेच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.
सायरन वाजवत गाड्या दाखल - गेटमनने दिलेली माहिती स्टेशन मास्तरांनी रेल्वे सुरक्षा बल, रुग्णवाहिका आणि पोलिसांना कळवली. त्यानंतर आर. पी. एफ, सिग्नल विभाग, टेलिकॉम, इंजिनिअरिंग, टी. आर. डी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका आणि पोलीस गाड्या सायरन वाजवत आल्या. त्यामुळे आजुबाजूच्या नागरिकांची झोप उडाली. नेमकं काय झालंय, हे पाहण्यासाठी नागरिकांनी रेल्वे गेटकडे धाव घेतली.
नेमकं काय घडलं होतं? - अपघात, आगीसारखी घटना घडल्यास आपत्कालिन यंत्रणा सज्ज आहे का, हे पाहण्यासाठी प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) केलं जातं. तसंच प्रात्यक्षिक अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि अतिरिक्त विभागीय सुरक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पहाटे रेल्वे गेट क्र. ९७ वर करण्यात आलं. ही बाब स्पष्ट होईपर्यंत स्थानिक नागरिक भयभीत होते. परंतु, हे प्रात्यक्षिक असल्याचं समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मॉक ड्रिलमुळं गांधीधाम-बंगळुरू एक्सप्रेसला पाऊण तास उशीर - खरोखरच अपघात झालाय, असं भासवण्यासाठी गांधीधाम-बंगळुरू एक्सप्रेस रेल्वे गेट नंबर ९७ वर जवळपास पाऊण तास थांबवून ठेवण्यात आली होती. त्या वेळात मॉक ड्रिल झालं. मात्र, मोठा आवाज आणि सायरन वाजवत आलेल्या गाड्यांमुळे रेल्वेचा खरंच अपघातच झालाय, असंच प्रत्येकाला वाटत होतं. या मॉक ड्रिलमुळं गांधीधाम-बंगळुरू एक्सप्रेसला मार्गस्थ होण्यासाठी पाऊण तास उशीर झाला.