मुंबई- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि क्रांतिकारी योजना ठरलीय. महायुतीला पुन्हा सरकारमध्ये आणण्यास ही योजना गेमचेंजर ठरल्याचे बोलले जातंय. दरम्यान, निवडणुकीपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापपर्यंत 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही, तर दुसरीकडे या महिन्याचा हप्ता 26 तारखेनंतर येण्यास सुरुवात होणार आहे. पण आता या योजनेबाबत एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट महिला आणि बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय.
पैसे परत घेणार नाही : या योजनेत ज्या लाभार्थी महिला आहेत आणि ज्या योजनेच्या निकषात बसत नाही आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्यांच्या घरी चारचाकी गाडी आहे. ज्या महिला नियमात बसत नाहीत, अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र यानंतर काही महिलांनी या योजनेतील पैसे सरकारला परत केले होते. पण सरकारने दिलेले पैसे कुठल्याही लाडक्या बहिणींकडून परत घेणार नाही किंवा आम्ही पैसे परत घेतले नाहीत. तसेच याबाबत कुठलाही शासकीय स्तरावर निर्णय झालेला नाही. अशी कुठलीही महायुतीमध्ये चर्चा झालेली नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय. आज त्यांनी मुंबईत माध्यमांची संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
म्हणून लाभार्थी बहिणी पैसे परत करतील : परंतु जर लाडक्या बहिणी स्वखुशीने सरकारला पैसे परत करीत आहेत. तसेच आम्ही योजनेच्या निकषात बसत नाही, असं म्हणून लाभार्थी बहिणींनी पैसे परत करीत असतील किंवा केले असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र सरकारने स्वतःहून कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत, असं यावेळी अदिती तटकरे यांनी सांगितले.
पालकमंत्रिपदावरून आंदोलन करणे योग्य : सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री हे दावोस दौऱ्यावर आहेत. तिथे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी रोज नवनवीन सामंजस्य करार केले जाताहेत, असे असताना राज्यात पालकमंत्रिपदावरून आंदोलन करणे किंवा एकमेकांवर टीका करणे हे अयोग्य आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाला स्थगिती दिलीय. प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्याला आपणाला पालकमंत्रिपद मिळाले पाहिजे, अशी त्यांची इच्छा असते. परंतु ती मागणी करत असताना आंदोलन करणे, महामार्ग अडवणे, जाळपोळ करणे हे चुकीचे आहे, असं म्हणत अदिती तटकरे यांनी मंत्री भरत गोगावलेंचे नाव न घेता टीका केलीय.
हेही वाचा-