मुंबई - भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर सर्व बाजूने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याबाबत बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत ते की, महायुतीच्या यशाच्या श्रेयात देवेंद्र फडणवीसांचा फार मोठा वाटा आहे. मुख्यमंत्रिपदासाठी ते योग्य व्यक्ती असून, या अगोदरसुद्धा त्यांनी या पदाचा योग्य तो सन्मान राखत जनतेला न्याय मिळवून दिलाय. आताही त्यांच्या नेतृत्वात राज्याला देशात सर्व घटकांच्या बाबतीत एक नंबरचं राज्य बनवलं जाईल, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.
मला कुठलं पद देतात ते मला माहीत नाही : खाते वाटपाबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मला कुठलं पद देतात ते मला माहीत नाही. मागच्या सरकारमध्ये महसूलमंत्रिपद त्यांच्याकडे होतं. पण आता पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, त्यांचं पालन ते करतील, असेही विखे-पाटील म्हणालेत.
राज्यपालाकडे आमदारांच्या संख्याबळाचं आणि बहुमत स्पष्ट असल्याचं पत्र : दुसरीकडे आज भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदाची नियुक्ती करण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर या तिघांमध्ये बैठक झाली. दरम्यान, यानंतर महायुतीतील नेत्यांनी राजभवन येथे जात राज्यपालाकडे आमदारांच्या संख्याबळाचं आणि बहुमत स्पष्ट असल्याचं पत्र राज्यपालांना सुपूर्द केलं. राज्यापालांनी सरकार स्थापनेसाठी महायुतीला गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता वेळ दिलीय. दरम्यान, नवीन सरकार येण्यापूर्वी या सरकारची ही शेवटची पत्रकार परिषद एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलीय.
हेही वाचा-