अहिल्यानगर : गोरगरीब लोकांच्या मदतीला कायम धावून जाणारा अर्थातच गरिबांचा मसीहा म्हणून ओळख असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या उदार व्यक्तिमत्त्वाचं आज पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील जनतेला दर्शन घडलय. पंधरा वर्षांपूर्वी अंधार झालेल्या गायत्रीच्या जीवनात पुन्हा एकदा सोनूच्या मदतीनं प्रकाश आला आहे.
गायत्रीला गेलेली दृष्टी पुन्हा मिळाली : कोपरगाव शहरातील गायत्री दशरथ थोरात अडीच वर्षांची असताना घराच्या अंगणात खेळता खेळता तिच्या डोळ्यात चुना गेल्यामुळं तिचा डावा डोळा पूर्ण निकामी झाला होता. उजव्या डोळ्यानं पुसटसं दिसायचं. जन्मभर असंच गायत्रीला राहावं लागणार याची खंत थोरात कुटुंबीयांना होती. कारण घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं गायत्रीचा डोळ्याची मुंबई, पुणे येथील मोठ्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याइतकीही परिस्थिती नसल्यानं अक्षरशः थोरात कुटुंबीयांनी नियतीसमोर हात टेकले होते. अशातच कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांच्या पुढाकारानं आणि बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांच्या मदतीमुळं महागडी शस्त्रक्रिया करून गायत्रीची गेलेली दृष्टी आज पुन्हा मिळाली असल्यानं थोरात कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
मदतीला धावून आले सोनू सूद : गायत्रीला दृष्टी मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तिचे वडील दशरथ आणि भाऊ कार्तिक खूप प्रयत्न करत होते. मात्र गायत्रीच्या डोळ्याची शस्त्रक्रिया पुणे, मुंबई येथील मोठ्या रुग्णालयात होणार त्यात शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार असल्यानं गायत्रीचे उपचार थांबले होते. त्यातच गायत्रीच्या वडलांना माहिती मिळाली की गोरगरीब लोकांच्या मदतीला अभिनेता सोनू सूद कायम धावून येतो. त्यानंतर थोरात कुटुंबीयांनी कोपरगावातील सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांना सांगून त्यांचे जवळचे मित्र असलेले अभिनेते सोनू सूद यांच्याकडं मदतीसाठी प्रयत्न केले. राक्षे यांनी गायत्री सोबत सोनू सूद यांचे बोलणे करून दिले आणि त्यांनी लगेचच मदतीसाठी होकार दिला. त्यानंतर गायत्रीला पुणे येथील व्हिजन केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे दाखल झाल्यानंतर इतर टेस्ट केल्या गेल्या. डॉ. स्वप्निल भालेकर यांनी गायत्रीच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली. अडिच तास ही शस्त्रक्रिया चालली. काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहिल्यानंतर गायत्री कोपरगावात आली.
थोरात कुटुंबीयांनी सोनू सूद यांचे मानले आभार : गायत्री घरी आल्यानंतर डोळ्यावरील पट्ट्या काढण्याआधी गायत्रीने माझे जीवन पुन्हा प्रकाशमय करणाऱ्या सोनू सूद आणि विनोद राक्षे यांना पाहायचं असल्याचं म्हणाली. त्यावेळी सोनूची प्रतिमा आणि राक्षे स्वतः समोर उभे राहिल्यानंतर गायत्रीनं आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. दोघांनाही पाहून गायत्रीचे डोळे पाणावले होते. यावेळी अभिनेता सोनू सूद यांचे आभार मानण्यासाठी गायत्रीच्या आई-वडिलांनी गावात छोटेखानी कार्यक्रम घेऊन सोनू सूद यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आभार मानले.
हेही वाचा -