मुंबई Uddhav Thackeray On BJP : केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत केव्हाही लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. तर, दुसरीकडं नेते देखील मतदार संघांमध्ये जाऊन सभा घेत लाआहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील जोगेश्वरी पूर्व इथं भेट दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. "भाजपावाल्यांना लग्नात बोलावू नका, येतील, जेवतील अन् नवरा बायकोचं भांडण लावतील," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
भारतीय जनता पार्टी आता भाडोत्री जनता पार्टी :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या मुंबईतील विविध मतदार संघांना भेटी देत आहेत. शनिवारी त्यांनी जोगेश्वरी पूर्व इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जोगेश्वरी इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "भारतीय जनता पार्टी आता भाडोत्री जनता पार्टी बनली आहे. मी हे बोलण्यामागंच कारण म्हणजे, आज त्यांच्याकडं स्वतःचे नेते नाहीत. सर्व भाडोत्री बाहेरुन इतर पक्षातून आयात केलेले नेते आहेत. आता थोड्यादिवसापूर्वीच भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही यादी नीट पाहा. भाजपावाले ज्या कृपाशंकर सिंह यांना भ्रष्टाचारी म्हणत बोंबलत होते, त्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. पण, निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाही."