ठाणे Malshej Ghat Accident: माळशेज घाटात पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सांताक्रूझमधील तरुण-तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून घरी निघालेल्या दोघांना भरधाव बसनं धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित रमेश डिंगणकर (वय 24 वर्षे) तसंच नंदिनी मयांगडे (वय 23 वर्षे), अशी मृतांची नावं आहेत. तर संजय पवार असं, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एस. टी. बस चालकाचं नाव आहे.
नाणेघाट जवळ झाली धडक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक रोहित रमेश डिंगणकर तसंच नंदिनी मयांगडे दोघेही मुंबईतील सांताक्रूझ-वाकोला भागात राहतात. ते गुरुवारी (20 जून रोजी) माळशेज घाटात दुचाकी क्रमांक (एमएच 02 एफपी 7446) वरून पावसाळी सहलीसाठी आले होते. दुपारपर्यंत सहलीचा आनंद घेतल्यावर दोघेही त्याच दुचाकीवरून घराच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी नाणेघाट जवळ त्यांच्या दुचाकीची एसटी-बसला समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दोघांचे मृतदेह मुरबाड शहरातील शासकीय उप-जिल्हा रुग्णालयात दाखल केले.