नागपूर : आई-वडिलांनी वाढदिवस साजरा केला नसल्यानं रागावलेल्या 10 वर्षीय चिमुकल्यानं स्वतःचं घर सोडले. ही घटना नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामनगर येथे घडली. याबाबत सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण वाठोडा परिसर पिंजून काढत मुलांचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी रागावलेल्या मुलाला खास वागवणूक देत आनंददायी क्षणाचा अनुभव करून दिला.
घर सोडणाऱ्या चिमुकल्याचा वाढदिवस वाठोडा पोलिसांनी साजरा करत त्या मुलाला सुखद धक्का दिलाय. पोलिसांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. संचित अरविंद नरड असं या निरागस बालकाचं नाव आहे. 30 जानेवारीला त्याचा वाढदिवस होता. परंतु, काही कारणास्तव त्याचे आई-वडील त्याचा वाढदिवस साजरा करु शकले नाहीत. त्यामुळं रागावलेल्या संचितनं सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान स्वतःच्या घरातून पळ काढला. मुलगा घरून बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच त्याचे आई-वडील घाबरले. त्यांनी तात्काळ वाठोडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर वाठोडा पोलिसांनी तात्काळ घर सोडून गेलेल्या संचितचा शोध सुरू केला.
अखेर मुलाचा शोध लागला : संचितचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करत शोध मोहीम हाती घेतली. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक परिसर पिंजून काढल्यानंतर सुमारे सात वाजता संचित स्वामीनारायण मंदिर परिसराजवळ सुखरूप सापडला. त्यानंतर वाठोडा पोलिसांनी त्याला आई-वडिलांच्या ताब्यात दिलं. संचित दिसताच आईनं त्याला हृदयाशी घट्ट धरत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ते पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. त्यानंतर पोलिसांनी संचितचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्याची मुलाची इच्छा होती, हे पाहून पोलिसांनी मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संचितनं आई-वडील आणि पोलिसांच्या उपस्थितीत केक कापला. यावेळी चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सर्वांचंच मन सुखावलं.
हेही वाचा -