मुंबई : मुंबई शहरातील चेंबूरच्या सुमन नगर उप-परिसरात शुक्रवारी (31 जाने.) बांधकामाधीन मेट्रोचा खांब एका रहिवासी इमारतीवर कोसळल्याची (metro pillar collapses in chembur) घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेमुळं सदर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळतंय. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळं मेट्रोच्या कामावर तसंच बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
कोणतीही जीवितहानी नाही : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-वडाळा मेट्रो लाईन 4 च्या खांबासाठी असलेला स्टील रीबार मुंबईतील एका गृहनिर्माण संस्थेच्या आवारात कोसळला. गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही. परंतु, सोसायटीच्या सुरक्षा केबिनच्या मेटल शीटचं नुकसान झालंय. एमएमआरडीएनं या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोन दिवसांत याची पूर्ण चौकशी केली जाईल, असं अधिकाऱ्यानं सांगितलंय.
#WATCH | Mumbai, Maharashtra: An under-construction metro pillar collapsed in Chembur, Suman Nagar. No injury has been reported so far. More details awaited. pic.twitter.com/4cjx738U9z
— ANI (@ANI) January 30, 2025
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या सुमन नगरच्या सायन ट्रॉम्बे मार्गावर मेट्रो स्टेशनचं काम सुरू आहे. या स्थानकाच्या बांधकामासाठी एक स्टीलचा केज तयार करण्यात आला होता. हा स्टीलचा केज 20 फूट उंच खांबांच्या साहाय्यानं उभारण्यात आला होता. हा स्टील केज बाजूला असलेल्या एका रहिवासी सोसायटीवर कोसळला.
क्रेनला परवानगी नव्हती म्हणून.. : एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सिमेंट काँक्रीटच्या खांबाचा खालचा भाग 4.5 मीटरपर्यंत बांधला गेला होता. तर घटना घडली तेव्हा वरच्या 8-मीटर सिंमेट काँक्रीटकरणाच्या मजबुतीकरणाचं काम सुरू होते. सामान्यत: स्टील रीबार ठेवण्यासाठी क्रेनचा वापर केला जातो. मात्र, वाहतूक पोलिसांनी जंक्शन हे वर्दळीचं ठिकाण असल्यानं क्रेनला परवानगी दिली नाही. मजबुतीकरण करण्यासाठी एका काँक्रीट ब्लॉकला दोरीनं बांधून सुरक्षित करण्यात आलं होतं, असंही अधिकाऱ्यानं सांगितलं.
हेही वाचा -
- कॉल सेंटरमधल्या 'त्या' दोघी कामावरून सुटल्या अन् घरी परतल्याच नाही; कोपरी सर्व्हिस रोडवर दोन तरुणींचा करुण अंत
- घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं ६-७ जणांना चिरडलं; महिलेचा मृत्यू, चार गंभीर जखमी
- कानात हेडफोन घालून रेल्वे रुळावरून चालणं जीवावर बेतलं; रेल्वेच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू - Mumbai Accident News