नवी मुंबई :पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हवालदाराची दोन मारेकऱ्यांनी गळा दाबून हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. या मारेकऱ्यांनी हवालदाराचा खून करुन त्यांना रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं. विजय चव्हाण असं हत्या करण्यात आलेल्या रेल्वे दलातील हवालदाराचं नाव आहे. वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण :विजय चव्हाण (42) हे रेल्वे पोलीसमध्ये हवालदार म्हणून पनवेल येथे कार्यरत होते. नवी मुंबईतील घणसोली इथं ते राहण्यास होते. बुधवारी 1 तारखेला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्तींनी हवालदार विजय चव्हाण यांना रबाळे ते घणसोली या रेल्वे स्थानकादरम्यान ठाण्याहुन वाशीच्या दिशेनं जाणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं. याबाबतची माहिती मोटरमनने रेल्वे पोलिसांना दिली. त्या नंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास केला असता घटनेतील मृत व्यक्ती ही पनवल रेल्वे पोलीस ठाण्यातील हवालदार विजय चव्हाण असल्याचं समोर आलं.
हवालदारानं मद्यपान केल्याचं उघड : मृत विजय रमेश चव्हाण घटनेच्या दिवशी मंगळवारी सुट्टीवर होते. त्यांच्या अंगावर पोलीस गणवेश नव्हता. त्यांनी मद्यपान देखील केलं होतं. बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास चव्हाण यांचा मृतदेह घणसोली ते रबाळे रेल्वे स्थानकाच्या मध्ये आढळून आला. या घटनेची मोटारमन यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. हवालदार विजय चव्हाण यांचा गळा दाबून त्यांची हत्या केल्याचं त्यामधून स्पष्ट झालं. हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह दोन मारेकऱ्यांनी रेल्वे समोर टाकला असल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. पोलिसांना अद्यापही आरोपीला पकडण्यात यश आलं नाही. पोलीस तपास सुरू आहे. रेल्वे पोलीस खात्यातील व्यक्तीचा अशा पद्धतीनं झालेला खून यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
- ठाणे ज्वेलर्स दिनेश चौधरी खून प्रकरणातील फरार आरोपी सोनूला उत्तर प्रदेशातून अटक
- कासगंज ABVP कार्यकर्ता चंदन गुप्ता हत्येप्रकरणी NIA कोर्टाचा मोठा निर्णय, सर्व २८ दोषींना जन्मठेपेची शिक्षा
- अटक केलेल्या आरोपींना बीड जिल्ह्यात ठेवू नये-भाजपा आमदार सुरेश धस यांची मागणी