महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण; मुख्य आरोपी शुक्लाची कार अंबर दिव्यासह जप्त, तीन जण ताब्यात - KALYAN NEWS

शहरातील आजमेरा सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला यांची कार आणि अंबर दिवा जप्त करण्यात आला आहे.

Car seized with amber lights
कार अंबर दिवासह जप्त (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : 17 hours ago

ठाणे: कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल आजमेरा सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबावर बाहेरचे गुंड बोलवून जीवघेणा हल्ला करणाऱ्या अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीतासह आणखी दोघांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे मुख्य आरोपी शुक्ला यांच्याकडं कोणताही अधिकार नसताना त्यांनी स्वतःच्या खासगी वाहनावर शासकीय अंबर दिवा वापरल्यामुळं त्यांची कार जप्त करण्यात आली. तसंच कल्याण आरटीओने आरोपी शुक्ला यांच्या वाहनावर नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती, कल्याण विभागाचे आरटीओ आशुतोष बारकुल यांनी दिली आहे.

काय आहे घटना? :कल्याण पश्चिम भागातील आजमेरा सोसायटीतील रहिवासी असलेले अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी घरात धूप अगरबत्ती लावणाऱ्या लता कळवीकट्टे यांना उद्देशून तुम्ही मराठी लोक घाणेरडे असता, तुम्ही मटण-मासळी खाता, तुम्हा मराठी लोकांची इमारतीत राहण्याची पात्रता नाही, असं बोलून लता यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात शेजारी राहणारे धीरज देशमुख यांनी शुक्ला आणि कळवीकट्टे यांना ‘तुम्ही भांडू नका. आपसात वाद मिटवा. तसंच शुक्ला यांना आपण सरसकट मराठी लोकांना अपमानित करू नका, असा सल्ला दिला होता. देशमुख यांच्या बोलण्याचा राग येऊन शुक्ला यांनी ‘मी मंत्रालयात कामाला आहे. मला मराठीचं सांगू नका. तुमच्यासारखे ५६ मराठी माझ्या समोर झाडू मारतात. मी मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून एक फोन केला तर तुमचे मराठीपण जाईल. थोडा वेळ थांबा तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देशमुख यांना दिली होती. हे प्रकरण मिटलं असं वाटत असताना, शुक्ला यांच्या इशाऱ्यावरून दहाजण हातात काठ्या, धारदार शस्त्रे घेऊन आजमेरा सोसायटीत आले होते. त्यांनी देशमुख यांच्या भावाला, पत्नी आणि अगरबत्ती लावणाऱ्या लता कळवीकट्टे यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत धीरज देशमुख जखमी झाले होते. याप्रकरणी धीरज देशमुख यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

प्रतिक्रिया देताना आशुतोष बारकुल (ETV Bharat Reporter)

अंबर दिवा आणि कार जप्त : दुसरीकडं कल्याण उपप्रादेशिक परिवहन महामंडळानं मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याची खासगी कार जप्त केली. या कारला नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड आकारला आहे. इन्शुरन्स आणि पीयूसी संपला असतानाही ही कार गेल्या चार वर्षापासून रस्त्यावर धावत आहे. तर पोलीस तपासात कल्याण योगी धाम परिसरामध्ये आजमेरा हाइट्स या सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणारे अखिलेश शुक्ला आयएएस अधिकारी सांगून स्थानिक रहिवाशांना धमकावत होते. तसंच शुक्ला हे त्यांच्या खासगी गाडीमध्ये अंबर दिवा लावून रुबाब करत होते. खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंबरनाथ वाघमोडे यांनी कारची तपासणी केली असून कारमधून अंबर दिवा जप्त केला आहे. तर पुढील तपास सुरू असल्याचं आशुतोष बारकुल यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. बीडचं प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी निगडीत असल्यानं दाबलं जाणार का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
  2. मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा शिवसेना उबाठाची तयारी; नाना पटोले म्हणाले मग संजय राऊतांना कोणी अडवलं ?
  3. उपमुख्यमंत्री पदावरून मंत्री मुश्रीफांचा 'यू टर्न'; म्हणाले लोकांना उत्साहित करण्यासाठी बोललो

ABOUT THE AUTHOR

...view details