गवळी आणि कोरकू समाजाचे श्रद्धास्थान ब्रह्मसती देवी अमरावती Brahma Sati Devi In Melghat :लहान बाळांना आजारपणात होणारे त्रास टळावेत, बाळ सदैव चांगलं राहावं यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी मेळघाटात 'ब्रह्मसती'ची उपासना केली जाते. चिखलदरापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या जंगल परिसरातून वाहणाऱ्या 'ब्रह्मसती' नदीच्या परिसरात असणाऱ्या ब्रह्मसतीच्या दर्शनासाठी मेळघाटातील गवळी आणि आदिवासी समाज मोठ्या श्रद्धेने येतो. महाभारत काळापासून ब्रह्मसतीची उपासना या भागात केली जाते. दक्षिणवाहिनी आणि उत्तरवाहिनी अशा दोन देवी एकाच ठिकाणी असून, चैत्र महिन्यात आणि नवरात्रोत्सवात या ठिकाणी यात्रा देखील भरते.
गवळी समाजाची देवी म्हणून प्रसिद्ध : चिखलदरालगत असणाऱ्या आलाडोह गावापासून जंगलात काही अंतरावर वाहणाऱ्या ब्रह्मसती नदीच्या काठालगत उंच भागात दक्षिणवाहिनी आणि उत्तरवाहिनी अशा दोन देवींची स्थापना आहे. या सती माता असून, पहिली देवी माता ही दक्षिणमुखी आहे. दुसरी देवी माता ही उत्तरमुखी आहे. 1240 दरम्यान मेळघाटात गवळी समाज राहायला आला. तेव्हापासून गवळी समाजाची देवी म्हणून ब्रह्मसतीची पूजा केली जाते, अशी माहिती आलाडोह येथील रहिवासी आणि शिक्षक रामचरण खडके यांनी ' ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. गवळी समाजासोबतच कोरकू जमातीच्या लोकांची देखील या देवीवर श्रद्धा आहे. डॉक्टरांजवळ जाऊन देखील बाळाला बरं वाटत नसले तर या देवीच्या दर्शनाला बाळाला आणलं जातं, असं देखील रामचरण खडके यांनी सांगितलं.
महाभारत काळापासून इतिहास : मेळघाटात चिखलदरा लगतच्या परिसरात फार पूर्वी महाभारत काळात विराट राजाचे राज्य होतं. विराट राजाच्या या वैराट नगरीत पांडव हे बारा वर्षाच्या अज्ञातवासात असताना विराट राजाच्या दरबारीच होते. विराट राजाच्या राज्यात असणाऱ्या देवीचे प्रसिद्ध मंदिर आज देखील चिखलदरालगत आहे. हे मंदिर आज 'देवी पॉईंट' म्हणून ओळखलं जातं. त्या काळातच आलाडोहलगतच्या जंगलात ब्रह्मसतीची स्थापना देखील झाली होती.
देवीची अशी आहे पूजा विधी : उत्तरवाहिनी आणि दक्षिणवाहिनी अशा असणाऱ्या ब्रह्मसती या देवीच्या मूर्तींवर कुठलंही छत नाही. उघड्यावरच असणाऱ्या या दोन्ही देवींपैकी दक्षिणवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीची उपासना ही लहान बाळांवर येणारे संकट, त्यांचे आजार बरे करण्यासाठी केली जाते. तसंच उत्तरवाहिनी देवीची उपासनाही सुख, धन, समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी करतात, अशी अख्यायिका आहे. 'ब्रह्मसती'च्या दर्शनापूर्वी बाजूलाच वाहणाऱ्या ब्रह्मसती या नदीच्या डोहात लहान बाळांसह इतर नागरिक देखील आंघोळ करतात. त्यानंतर ओल्या कपड्यानेच या देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचे दर्शन घेतल्यावर लहान बाळाच्या अंगातील ओले कपडे या ठिकाणीच देवीला वाहण्याच्या उद्देशाने टाकले जातात. यामुळंच दक्षिणवाहिनी देवीजवळ कपड्यांचा ढिगारा पडलेला दिसतो. देवीला भोपळा वाहण्याची देखील प्रथा असून या ठिकाणी बरेच भोपळे देखील आढळतात.
सूर्य आणि चंद्रपूजेला महत्त्व : दक्षिणवाहिनी आणि उत्तरवाहिनी असणाऱ्या या दोन्ही ब्रह्मसतीच्या शिलेवर एक हात आणि हाताच्या दोन्ही बाजूला चंद्र आणि सूर्य आहेत. या भागात चंद्र आणि सूर्याच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे. देवीच्या दोन्ही शिळांवर चंद्र आणि सूर्य कोरले असून, दक्षिणवाहिनी देवीच्या शिळेवर चंद्र, सूर्य एक हात आणि त्यासोबतच वाघावर स्वर असणाऱ्या देवीचे रुप कोरलेले दिसतात. उत्तरवाहिनी असणाऱ्या देवीच्या शिळेवर वरच्या बाजूला एक हात चंद्र ,सूर्य आणि खाली देवीचे दोन रूप आढळतात. या दोन्ही शिलांवर केलेले कोरीव काम हे अतिशय सुबक आणि पुरातन आहे.
('ईटीव्ही भारत' अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. वरील माहिती अख्यायिका आणि भक्तांच्या श्रद्धेनुसार आहे)
हेही वाचा -
- Man Animal Conflict 2023 : राज्यात मनुष्य आणि वन्यजीव संघर्षात वाढ; वर्षभरात 100 जणांनी गमाविले प्राण
- Melghat Ganesha Darshan : मेळघाटात एकाच छताखाली सहा हजाराहून अधिक गणपतींचे दर्शन; नंद दाम्पत्याचा पुढाकार
- Nagapanchami Today : नागपंचमीला नाग देवतेला प्रसन्न करण्यासाठी दिला जातो कोंबड्याचा बळी, वाचा कुठे आहे ही प्रथा