छत्रपती संभाजीनगर : 31 डिसेंबर रोजी रात्री नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई पार्टीचं आयोजन करतात. दरम्यान कार्यक्रमाचा आनंद घेत असताना किंवा घरी परतत असताना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते. त्यावर तोडगा म्हणून अनेकांनी चक्क मद्य परवाना काढलाय. एका रात्रीसाठी तब्बल 65 हजार तळीरामांनी अधिकृतपणे अर्ज करून परवाना मिळवला आहे. मात्र दुसरीकडं मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा तोकडी असून फक्त चार मशीनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची भिस्त आहे.
65 हजार तळीरामांनी काढला मद्य परवाना : राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहे. एका दिवसासाठी तब्बल 65 हजार तळीरामांनी दारू पिण्याचा परवाना काढला आहे. "विदेशी दारूसाठी 55 हजार परवाने तर देशी दारूसाठी 10 हजार परवाने देण्यात आले आहेत. तर राज्य उत्पादन शुल्काने बेकायदेशीर होणाऱ्या विक्री आणि घटना टाळण्यासाठी सात पथके तयार केली आहेत. मध्य निर्मिती कारखान्यांवर पथकाचे सीसीटीव्ही कॅमेरे लक्ष ठेवून आहेत. शहरामध्ये सात ठिकाणी मोठ्या पार्ट्या होणार असून त्यांनी देखील त्यासाठी परवानगी काढली आहे," अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे.
मद्यपी चालकांची तपासणी करण्यासाठी केवळ चार यंत्र : मध्यरात्री नववर्षाचे स्वागत होत असताना सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यातील पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं टवाळखोर, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी कंबर कसली. "जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपासून पहाटे 5 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. शहरात 1200 पोलीस रस्त्यांवर ठिकठिकाणी तैनात होते. शिवाय, 18 प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडं मद्यपी चालकांची तपासणी करण्यासाठी केवळ चार यंत्र असल्यानं त्यांच्या मार्फत फक्त शहरातच तपासणी करण्यात आली," अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे.
कसा ठेवण्यात आला पोलिसांचा बंदोबस्त :
- 68 संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट
- 18 महत्त्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी
- 50 पेक्षा अधिक वाहनांतून पोलिसांची फिरती गस्त
- गुन्हे शाखा, विषेश शाखेचे साध्या वेशात 10 पथके,
- 3 पोलीस उपायुक्त, 6 सहायक आयुक्तांसह जवळपास 100 अधिकारी व 1200 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात.
हेही वाचा :