मुंबई Tiger Numbers Reduce In Maharashtra :राज्यातील वाघांची संख्या विविध कारणांमुळे कमी होत असून गेल्या दीड वर्षात राज्यातील सुमारे 67 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. वाघांच्या संरक्षणासाठी सरकारनं विविध उपाययोजना केल्या असून वाईल्ड लाईफ क्राईम सेलची स्थापना केल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. "राज्यातील वाघांची संख्या कमी होत असून सरकार याबाबत गांभीर्यानं विचार करत आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात सुमारे 67 वाघांचा मृत्यू झाला. विविध कारणांमुळे या वाघांचा मृत्यू झाला," अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या उत्तरात दिली.
2023 मध्ये इतक्या वाघांचा झाला मृत्यू :सन 2023 मध्ये राज्यात नैसर्गिकरित्या मृत्यू झालेले वाघ 26, अपघातामुळे मृत्यू झालेले वाघ 10, विषबाधेमुळे मृत्यू झालेले वाघ 2, विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झालेल्या वाघांची संख्या 9 तर शिकारीमुळे चार वाघांना जीव गमवावा लागला होता. एकूण 51 वाघांचा मृत्यू झाला. यावर्षी मे महिन्यापर्यंत नैसर्गिकरित्या 8 वाघांचा मृत्यू, अपघातानं 2 वाघांचा मृत्यू, विद्युत प्रवाहामुळे 1 आणि 5 वाघांचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सुरू असून आतापर्यंत एकूण 16 वाघांचा मृत्यू झाला आहे. एकूणच गेल्या दीड वर्षात 67 वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
विद्युत प्रवाहामुळे वाघांचा मृत्यू :राज्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये जंगली प्राण्यांपासून रक्षणासाठी तारेचं कुंपण बांधतात. त्यात विद्युत प्रवाह सोडतात, तर अनेक शिकारी सुद्धा शिकार करण्यासाठी विद्युत प्रवाहाचा वापर करतात. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विद्युत प्रवाहामुळे 22 वाघांचा मृत्यू झाल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलं आहे. तर वाघांच्या नखांची आणि कातडीची चोरी झाल्याचं आढळून येत नसून ही नखं अपघातानं तुटली असावी, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.