मुंबई Threats Political Leaders : लोकसभा निवडणूक, जागावाटप, उमेदवारी, आचारसंहिता, प्रचार यांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना मागील आठ दिवसात तीन राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ झाली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात काहीसं चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय.
कोणकोणत्या नेत्यांना मिळाली धमकी : गेल्या दोन वर्षांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. दीड वर्षांपूर्वी कर्नाटकातून खंडणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आला होता. तसंच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनाही जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही आपल्यावर पाळत ठेवली जात असून, आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला होता. तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपणाला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचं म्हटलं होतं. तर ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला होता.
एका आठवड्यात 3 धमक्या : मागील आठ दिवसात तीन राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसंच दोन दिवसांपूर्वी इंदापूरचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलंय. या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं असून मित्र पक्षातील पदाधिकारी अत्यंत खालच्या भाषेत टीका करत आहेत. तसंच तुम्हाला तालुक्यामध्ये फिरू देणार नाही अशी धमकी देताहेत", असं ते पत्रात म्हणालेत.