बीड- राष्ट्रवादीच्या (शरचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये जाऊन हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh murder case) कुटुंबाची घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती, अशी माहिती खासदार सुळे यांनी दिली. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी दोन महिने उलटूनही आरोपी कृष्णा आंधळे फरार असल्यानं खासदार सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली.
खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण जाण्यापूर्वी आरोपी वाल्मिक कराडनं व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, " आत्मसमर्पण करण्यापूर्वी असा व्हिडिओ बनवण्याची लोकांची हिंमत कशी होते? कृष्णा आंधळे कुठे आहे? जर ते (सरकार) दररोज आमचे फोन टॅप करू शकतात. तर ते कृष्णा आंधळे शोधू शकत नाहीत का? हे पटणारे नाही. तानाजी सावंतांचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही? देशमुख कुटुंबानं मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांना आठ दिवसांत न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मी मुख्यमंत्र्यांना भेटून देशमुखांच्या कुटुंबासाठी न्याय मागणार आहे."
लाईव्ह | 📍परळी, बीड | पत्रकारांशी संवाद 18-02-2025
— Supriya Sule (@supriya_sule) February 18, 2025
https://t.co/7EjR0R9elo
कोणतीही तडजोड होऊ देणार नाही- मस्साजोगचे ग्रामस्थ सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात न्याय मिळावा, याकरिता उपोषण करणार आहेत. त्यावर खासदार सुळे यांनी ग्रामस्थांना उपोषण न करण्याचं आवाहन करत न्यायासाठी लढणार असल्याची ग्वाही दिली. या प्रकरणात कोणतीही तडजोड होऊ देणार नाही आणि न्यायालयीन प्रक्रियेकडेही लक्ष देईन, असा विश्वासही खासदार सुळे यांनी देशमुख कुटुंबीयांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हत्येच्या घटनेपूर्वी आणि हत्येनंतर आरोपी आणि पोलिसांमधील सर्व फोन कॉल्सची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली.
पीडित कुटुंबाचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचावे यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. त्यांनी भेटून आम्ही गुन्हेगारांना कठोर शासन अर्थात फाशी व्हावी, अशी मागणी करणार आहोत-खासदार, सुप्रिया सुळे
- सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी खासदार सुळे यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "त्यांनी न्याय मिळेपर्यंत आमच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी आमच्या कुटुंबाला आणि ग्रामस्थांना हे आश्वासन दिलं आहे."
हेही वाचा-