अमरावती- छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या आस्थेचं प्रतीक, त्यांची उद्या 395 वी जयंती. दक्षिणेत आदिलशाही आणि उत्तरेस बलाढ्य अशा मुगल साम्राज्याला हादरवून सोडणारं छत्रपतींचं शौर्य प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे. सह्याद्रीतील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री, मराठवाडा, तळ कोकण या प्रांतात स्वराज्य स्थापन केलं. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत. छत्रपतींचा वऱ्हाड अर्थात विदर्भाशीदेखील अतिशय जवळचा संबंध आलाय. छत्रपतींचे वऱ्हाडशी असणारं नातं याबाबत" ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.
सिंदखेड राजा छत्रपतींचं आजोळ : विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ आहे. राष्ट्रमाता जिजाबाई यांचं हे जन्मस्थान असून, छत्रपतींच्या आईचं बालपण हे सिंदखेडराजा येथेच गेलंय. विदर्भात आजोळ असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची वऱ्हाडशी खऱ्या अर्थाने नाळ जोडली होती, असं बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रा. डॉ. किशोर वानखडेंनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.
सुरतेवरच्या स्वारीचा मार्ग वऱ्हाडातूनच : स्वराज्यावर शाहिस्तेखानाच्या लुटीमुळं आर्थिक संकट कोसळलं. स्वराज्याची ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची बहीण जहाआराच्या अधिकारात असणाऱ्या सुरत शहरावर दोन वेळा स्वारी केली. या स्वारीनंतर छत्रपती शिवाजी महाराज हे मलकापूर, वडनेर-भुलजी या वऱ्हाडातील मार्गानं पुण्याला गेलेत. वडनेर भुलजी आणि मलकापूर जवळच्या निंबादेवी संस्थान याठिकाणी या घटनांचा संदर्भदेखील उपलब्ध आहे, असं प्रा. डॉ. किशोर वानखडे म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळवलेला खजिना हा बुलढाणा जिल्ह्यातील रोहिणखेडच्या मार्गानं नेण्यात आला.
वऱ्हाडातील कारंजा शहरात केली छत्रपतींनी स्वारी : पुरंदरचा तह हा मिर्झा राजे जयसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात झाला होता. या त्यामुळं तब्बल 23 किल्ले आणि मोठा प्रदेश मुगलांना समर्पित करण्यात आला होता. चार वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा किल्ले जिंकण्यास सुरुवात केली. कोंढाणा किल्ल्यापासून किल्ले जिंकण्याची मुहूर्तमेढ रोवली असताना त्यावेळी वऱ्हाडातील सर्वात श्रीमंत असणारं कारंजा शहरावर 3 ऑगस्ट 1670 ला स्वारी केली. या स्वारीनंतर छत्रपती शिवाजी महाराज अकोला जिल्ह्यातील बाळापूरला 8 ऑगस्ट 1670 मध्ये आलेत. बाळापूरला सैय्यद शाह इनायत उल्ल नक्षेबंदी या सुफी संताच्या दर्ग्याची भेट घेतली. या सुफी संताच्या दर्ग्याला मासिक 1 रुपये वर्गणी दिली. 1960 पर्यंत भोसले कुटुंबाकडून या दर्ग्याला देणगी रक्कम मिळत राहिली. एक रुपयाचं मूल्य हे 1428 रुपये झालं होतं. याचा उल्लेख "तारिक ए इन्कलाबी किरदा शिवाजी महाराज" या ग्रंथाचे लेखक प्रा. शाहाज अली यांनी यावर विस्तृत प्रकाश टाकलं असल्याचं प्रा. डॉ. किशोर वानखडे यांनी सांगितलंय.
छत्रपतींच्या सातव्या पत्नी वऱ्हाडातल्या : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातव्या गुणवतीबाई इंगळे ही पत्नी या वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या करवंड या गावातील इंगळे कुटुंबातील होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांच्या पत्नी दीपाबाई यासुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील होत्या. दीपाबाईंनी व्यंकोजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला. बुलढाणा जिल्ह्यात जाधव कुटुंबातील अंबिकाबाई यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज यांच्याशी झाला होता.
आग्र्यावरून परतताना मैलगडावर मुक्काम : छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून स्वतःची सुटका करून मराठी मुलाखत आले, त्यावेळी ते बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद येथील मैलगड किल्ल्यात काही काळ मुक्कामी होते. यावेळी त्या किल्ल्याचा गोसावी नावाचा किल्लेदार होता. औरंगजेबाच्या आमिषाला बळी पडून त्यानं छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर आहेत, ही गुप्त माहिती औरंगजेबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु किल्लेदाराच्या पत्नींनं छत्रपतींना सावध केलंय. यामुळं छत्रपती शिवाजी महाराज मैलगड किल्ल्यावरून सहीसलामत निसटले आणि कुठल्या मार्गानं पुढे गेलेत याची माहिती मात्र उपलब्ध नाही, असं प्रा.डॉ. किशोर वानखडे सांगतात.
संभाजी महाराजांकडं बाळापूर अन् आवंढ्यांची सुभेदारी : पुरंदरच्या तहानुसार संभाजी महाराज यांना वऱ्हाडातली बाळापूर आणि आवंढ्याची सुभेदारी देण्यात आली होती. एकूणच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांचाही वऱ्हाडशी फार जवळचा संबंध आलाय. फरक फक्त इतका आहे की मराठवाडा, उत्तर कोकण, दक्षिण कोकण, तळकोकणमध्ये स्वराज्य स्थापन झालंय. स्वराज्यातील किल्ले त्या भागात होते. वऱ्हाडात मात्र छत्रपतींचे किल्ले अस्तित्वात नव्हते, असंही प्रा. डॉ. किशोर वानखडे म्हणालेत.
हेही वाचाः
अभिमानास्पद! जपानच्या टोकियोत उभारणार शिवरायांचं स्मारक, 'या' तारखेला होणार उद्घाटन
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी छ. शिवाजी महाराजांची रेखाटली रांगोळी, पाहा व्हिडिओ