संगमनेर : संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात बनावट नोटा छापण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली पोलिसांच्या तपासादरम्यान याचा मागोवा लागल्यानंतर पुणे गुप्तचर विभागानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं गुरुवारी सकाळी छापा टाकत कारवाई केली.
नोटांसाठी चीनहून मागवला विशेष कागद : संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी-वेल्हाळे रस्त्यावरील एका घरात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा छापून बाजारात आणण्याचा कट रचला जात होता. बनावट नोटांसाठी चीनहून विशेष कागद मागवून 500 आणि 100 रुपयांच्या नोटांची झेरॉक्स काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, छपाईत त्रुटी आढळल्यानं त्या नोटा कचऱ्यात फेकण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्या जप्त करून पुढील तपास सुरू केलाय.
साहित्य केलं जप्त : छाप्यादरम्यान पोलिसांनी प्रिंटिंग मशीन, विशेष कागद आणि इतर साहित्य जप्त केलं. या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी वेल्हाळे रस्ता येथून रजनीकांत रहाणे याला ताब्यात घेण्यात आलं. या कारवाईमुळं परिसरात खळबळ उडाली असून बनावट नोटा छपाईच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण आहे? याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी दिली.
बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस : या आधीही अशीच एक घटना घडली होती. अमरावती जिल्ह्यात 2 जानेवारी रोजी बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस आलं होतं. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी तपास केला असता, त्याचे धागेदोरे सातारा जिल्ह्यात असल्याचं उघड झालं होतं. यावेळी पोलिसांनी शंभर रुपयांच्या 31 बनावट नोटा जप्त केल्या होत्या. नितीन चंद्रकांत जाधव आणि सूरज मारुती धस, अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत.
हेही वाचा -