नांदेडATM Machine Theft Case:बारड ते भोकर रोडवर बँक ऑफ महाराष्ट्रचं एटीएम आहे. एटीएम मशीनमध्ये लाखोंची रक्कम देखील होती. शनिवारी रात्री सवा दोन वाजेच्या सुमारास काही अज्ञात चोरटे एटीएमवर पोहोचले. सुरुवातीला त्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारुन वायर कट केले, त्यानंतर एटीएम मशीनला दोरीनं बांधून मशीन फोडली आणि पैशानं भरलेली मशीन लंपास केली. रविवारी सकाळी काही नागरिकांना चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. घटनेची माहिती बारड पोलिसांना देण्यात आली. घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक ए. के. धरणे, पोलीस उपाधीक्षक जॉन बेन यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकाऱ्यांनी घटस्थळी धाव घेतली. घटनास्थळी दोरी आणि चोरीचं इतर साहित्य पोलिसांना आढळून आलं.
चोरटे इतर राज्यातील असल्याचा संशय :चोरटे इतर राज्यातील असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही नांदेड शहरात अशाच प्रकारे दोन एटीएम मशीन पळवल्याची घटना घडली होती. अद्याप या घटनेचा छडा लागला नाहीये. दरम्यान या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुदखेड तालुक्यात मागील काही महिन्यांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली. पोलिसांकडून रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग देखील केली जातं नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातं आहे.