नागपूरBhimrao Ambedkar About Deekshabhumi : १ जुलै रोजी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंगच्या विरोधात झालेली जाळपोळ आणि तोडफोड हा कारस्थानाचा भाग होता, असा आरोप राष्ट्रीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर यांनी केला आहे. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी आज दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी यामागे दीक्षाभूमी स्मारक समितीचा हात असल्याचा आरोप केला असून ही समिती तत्काळ बरखास्त करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दीक्षाभूमीविषयी मत मांडताना आंबेडकरवादी नेते भीमराव आंबेडकर (ETV Bharat Reporter) दीक्षाभूमीच्या विद्रुपीकरणाचा आरोप :काही जण पवित्र दीक्षाभूमी विद्रुपीकरण करण्याचं कारस्थान रचत असल्याचा आरोपही भीमराव आंबेडकर यांनी यावेळी केला. राष्ट्रीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर यांनी आज दीक्षाभूमीला भेट दिली. त्यावेळी वंचित आघाडी, बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि इतर शेकडो कार्यकर्ते हजर होते.
चेंगरा-चेंगरीची घटना घडवण्याचं कारस्थान : येत्या १२ ॲाक्टोबर रोजी या पवित्र दीक्षाभूमीच्या भूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित केला जाणार आहे. त्यापूर्वी भूमिगत पार्किंगसाठी खणण्यात आलेला खड्डा बुजवण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. दीक्षाभूमी येथे हाथरससारखी चेंगरा-चेंगरीची घटना घडवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचंही आंबेडकर म्हणाले आहेत.
गुन्हे मागे घेण्याची मागणी : १ जुलै रोजी दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंगच्या विरोधात झालेल्या तीव्र आंदोलनानंतर पोलिसांनी भीमसैनिकांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी भीमराव आंबेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह नागपूर शहर पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. आज प्रकाश आंबेडकर हे देखील मुख्यमंत्र्यांना भेटून गुन्हे मागे घेण्याची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ज्यांनी दीक्षाभूमी येथे नासधूस व जाळपोळ केली ते स्मारक समितीने पाठवलेले लोक होते, असा आरोप त्यांनी केलाय.
दीक्षाभूमी स्तूपास धोका, नागरिकांचा आरोप : दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. समस्या मार्गी लावण्यासाठी भूमिगत दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंग तयार केली जात आहे; मात्र, त्यामुळे दीक्षाभूमी स्तूपास धोका निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. त्यामुळे आज उग्र आंदोलन करण्यात आलं.
हेही वाचा:
- नागपूर दीक्षाभूमी तोडफोड प्रकरणी वंचितच्या शहराध्यक्षांसह 15 जणांवर गुन्हा दाखल, दीक्षाभूमीला छावणीचे स्वरूप - Nagpur Deekshabhoomi
- दीक्षाभूमीवर तणावपूर्ण शांतता; बंदोबस्तामुळं छावणीचं स्वरूप, सर्व रस्ते बंद - Nagpur Deekshabhoomi
- दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंग विरोधात बौद्ध अनुयायांचं उग्र आंदोलन, सरकार खडबडून जागं, तातडीनं कामाला स्थगिती - Dikshabhoomi Agitation