ठाणे : अल्पवयीन मुलगी हरविल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी वाशिंद पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस पथकाने प्रियकर आणि प्रेयसीचा शोध सुरू केला. एक महिन्याच्या तपासानंतर दोघे मध्यप्रदेश राज्यातील एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन राजधानी एक्सप्रेसने येत असतानाच प्रियकराचा धावत्या रेल्वेमधून पडून संशयास्पद मृत्यू झाला होता. अनिकेत जाधव (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मृत्यू झालेल्या तरुणाच्या भावाची आणि संघटनेच्या नेत्याची प्रतिक्रिया (Source- ETV Bharat Reporter)
तरुणानं रेल्वेच्या बोगीमधील टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा पोलिसांनी दावा केला. मात्र, तरुणाच्या नातेवाईकांनी ग्रामीण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे संशय व्यक्त करत तक्रार केली. आमचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने आत्महत्या नव्हे तर त्याची हत्या झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस अंमलदार अशा तिघांना निलंबित करण्यात आले. त्यांची चौकशी सुरू असल्यानं ठाणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशला पळून गेले-मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील अनिकेत जाधव आणि शहापूर तालुक्यातील नात्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होते. प्रेमातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. २५ जुलै रोजी दोघेही लग्न करण्याच्या उद्देशानं पळून गेले. मात्र, त्यावेळी अनिकेत याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकानं वाशिंद पोलीस ठाण्यात दिली होती.
अपघाती मृत्यू झाल्याची नोंद-अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस पथकानं दोघांचा शोध सुरू केला. ते दोघे महिनाभरापासून मध्यप्रदेश राज्यातील एका शहरात असल्याची माहिती वाशिंद पोलिसांना मिळाली. वाशिंद पोलिसांनी आणि मुलीच्या नातेवाईकांनी मध्यप्रदेशातील पोलिसांच्या मदतीनं मध्यप्रदेश येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणाहून अनिकेत आणि त्याच्या सोबत असलेली अल्पवयीन मुलगी दोघांना २५ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र राज्यात घेऊन येत असताना राजधानी एक्सप्रेस गॉलियर रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या मुराई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे येताच अनिकेतनं बोगीच्या टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचं वाशिंद पोलिसांनी त्यावेळी सांगितले. त्यामुळं त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद मुराई रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली.
आंदोलनाचा दिला होता इशारा-अनिकेतच्या नातेवाईकांनी त्याचा मृत्यू नव्हे तर त्याचा घातपात असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असतानाही अनिकेतचा रेल्वे अपघातात मृत्यू होणं संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिकेतच्या कुटुंबीयांनी केली. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला. या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी अनिकेतला मध्यप्रदेशमधून ताब्यात घेणारे वाशिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वांगड, पोलीस अंमलदार जोगदंड आणि चलवादी या तिघांना ३१ ऑगस्ट रोजी निलंबित केले. त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी दिली आहे.
हेही वाचा-
- बेकायदेशीर वास्तव्य करणार्या 5 बांगलादेशी महिलांना मिरा रोडमधून अटक - Bangladeshi Nationals Arrest
- अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराकडून पतीची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकला खाडीत! - Thane crime News