ठाणे : केवळ ५०० रुपयासांठी मोठा भाऊ लहान भावाच्या जीवावर उठल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खिशातले ५०० रुपये का घेतले? यावरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, मोठ्या भावाने लहान भावाचा खून (Murder) केला. ही घटना कल्याण पश्चिम भागातील रोहिदास वाडा परिसरात असलेल्या सलीम रामपुरी चाळीत घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मोठ्या भावाला पोलिसांनी गजाआड केलं आहे. सलीम शमीम खान (वय ३२) असं अटक केलेल्या आरोपी भावाचं नाव आहे. तर नईम शमीम खान (२७) असं मृत्यू झालेल्या लहान भावाचं नाव आहे. अशी माहिती पीआय लक्ष्मण साबळे यांनी दिली.
कशी घडली घटना? :पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "मृत नईम आणि सलीम हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. दोघेही सलीम रामपुरी चाळीत राहतात. त्यातच ७ जानेवारी रोजी रात्री १० वाजल्याच्या सुमारास मृत लहान भावानं मोठ्या भावाच्या खिशातून ५०० रुपये काढून घेतले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या भांडणात त्यांची आई मध्ये पडली. मी तुला पाचशे रुपये देते असं तिने सांगितलं. मात्र भावासोबत वाद घालू नको, अशी विनंती त्यांच्या आईने केली. मात्र दोन भावांमध्ये वाद एवढा विकोपाला गेला की, मोठा भाऊ सलीम खान यानं लहान भाऊ नईमवर वार केला या हल्ल्यात नईम हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारात दरम्यान त्याचा मृत्यू झाला", अशी माहिती लक्ष्मण साबळे यांनी दिली.