मुंबई - लीलावती रुग्णालयातून अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याचा जबाब नोंदवला आहे. या जबाबात सैफ अली खाननं 16 जानेवारीच्या रात्री नेमकं काय झालं याबद्दल पोलिसांना सांगितलं आहे. सैफनं आपल्या जबाबात अकराव्या माळ्यावरील घराची रचना सांगितली. याशिवाय तो कोण कुठे राहतो आणि हा चोर नेमका कुठे होता याबद्दल त्यानं माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफनं आपल्या जबाबात म्हटलं आहे की, 11व्या मजल्यावर 3 बेडरूम आहेत. त्यातील एका बेडरूममध्ये करीना आणि सैफ राहतात. दुसऱ्या खोलीत तैमूर राहतो आणि त्याच्याबरोबर त्याची केअरटेकर गीता देखील राहते. तिसऱ्या खोलीत जहांगीर राहतो आणि त्याच्याबरोबर त्याची केअरटेकर एलियामा फिलिप बेडरूममध्ये राहते.
सैफ अली खानचा जबाब नोंदवला : दरम्यान याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अभिनेता सैफ अली खान आणि त्यांची पत्नी करीना कपूर खान 11व्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. रात्री अचानक त्यांना लहान मुलगा जहांगीरच्या बेडरूम मधून त्याची केअरटेकर एलियामा फिलिपच्या किंचाळण्याचा आवाज आला. ओरडण्याचा आवाज ऐकून सैफ आणि करीना जेहच्या खोलीकडे धावले. यावेळी सैफनं जेहच्या खोलीत आरोपीला पाहिलं. हा आरोपी जेह आणि त्याची केअरटेकर एलियामा फिलिपवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी सैफ तिथे आला आणि त्यानं त्या आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली.
काय घडलं 16 जानेवारीच्या रात्री ?: यानंतर सैफनं आरोपीला पकडून ठेवलं होतं. मात्र स्वतःची सुटका करण्यासाठी या आरोपीनं सैफ अली खानच्या पाठीवर, मानेवर आणि हातावर चाकूनं वार केला. जखमी अवस्थेत सैफ अली खाननं चोरी करण्यासाठी आलेल्या आरोपीला दूर ढकलले आणि घरातील इतर कर्मचाऱ्यांना देखील आवाज दिला. त्यावेळी सैफनं हल्लेखोराला जहांगीरच्या खोलीत बंद केलं. घरातील कर्मचारी जेहबरोबर 12व्या मजल्यावर पळून गेले. आवाज ऐकून इतर कर्मचारी रमेश, हरी, रामू आणि पासवान खाली आले. यानंतर सैफनं आरोपीला ज्या खोलीत कोंडले होते, त्या खोलीत हल्लेखोर नसल्याचे दिसले. त्यांनी संपूर्ण घरात शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्याच दरम्यान, सैफ अली खानला ऑटो रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं. असा घटनाक्रम सैफ अली खाननं आपल्या जबाबात पोलिसांना सांगितला आहे.
हेही वाचा :