ठाणे Thane Crime News:एका वर-वधू सूचक मंडळाच्या वेबसाईटवरील ॲपवर ओळख झालेल्या २९ वर्षाच्या तरुणीला एका हायप्रोफाईल भामट्यानं लग्नाचं आमिष दाखवून ६० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गंडा घालणाऱ्या भामट्याच्या विरोधात ४२०सह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कुणाल संतोष पाटील (रा. हिरानंंदानी, ठाणे) असं गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी कल्याण पश्चिमेतील एका उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या गृहसंकुलात राहाते. ही तरुणी एका कंपनीत नोकरी करीत आहे. त्यातच लग्न करायचं असल्यानं तिनं विविध वधू-वर सूचक मंडळांमध्ये सुस्वरुप तरुणाची चौकशी सुरू केली. अशातच मॅट्रोमोनियल वेबसाईटवरील ॲपच्या माध्यमातून वधू वर सूचक मंडळावर गेल्या वर्षी नाव नोंदणी केली होती. त्याच माध्यमातून तरुणीची ओळख गेल्या वर्षीजुलैमध्ये आरोपी कुणाल पाटील याच्याबरोबर झाली.
कुणालने तरुणीबरोबर लग्न करायची तयारी दर्शवली. लवकरच लग्न करू, असं आश्वासन दिलं. दरम्यानच्या काळात कुणालनं विविध कारणं देऊन तरुणीकडून पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. लग्न होणार असल्यानं तरुणीनं स्वतःच्या क्रेडिट कार्ड, आई-वडिलांच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या नावे विविध बँकांमधून कर्जाऊ रकमा घेऊन ते पैसे भावी पती कुणाल पाटील यास दिले.
वर्षभराच्या कालावधीत ५९ लाख ५६ हजार रुपये उकळले:या कर्जाऊ रकमेचे सर्व हप्ते आपण स्वतः फेडू, असं आश्वासन आरोपी कुणालने तरुणीला दिलं होतं. त्यामुळे तरुणी निश्चिंत होती. अशाप्रकारे कुणालने तरुणीकडून वर्षभराच्या कालावधीत ५९ लाख ५६ हजार रुपये उकळले. तरुणीने हे पैसे कुणालला ऑनलाईन माध्यमातून त्याच्या बँकेत पाठवले होते. वर्ष होत आलं तरी तरुण आपल्याबरोबर विवाह करत नाही. दुसरीकडे पीडित तरुणीने घेतलेल्या कर्जाऊ रकमांचे हप्ते सुरू झाले. त्याच्यावरील व्याज वाढत चालले म्हणून पीडित तरुणीने या रकमा भरण्याची गळ आरोपी कुणाल पाटीलला घातली. त्यावेळी विविध कारणे देऊन या रकमा भरण्यास टाळाटाळ करू लागला.
जुलै २००३ मध्ये झाली ओळख : तरुणीने त्याला आपण लग्न कधी करायचं असा प्रश्न विचारण्यास सुरू केलं. त्यावरही कुणाल टंंगळमंंगळ करू लागला. नंतर कुणालनं पीडित तरुणीच्या मोबाईलवर संपर्काला प्रतिसाद देणं बंद केलं. कर्ज देणारी मित्र मंडळी दारात येऊ लागली. वाद वाढू लागला. अखेर कुणाल संतोष पाटील. यानं जुलै २०२३ ते आजपर्यंतच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. शिवाय आरोपी कुणालनं लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केली आहे, हे लक्षात आल्यावर तरूणीनं १९ जून रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुकादम करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे.
हेही वाचा
- काय सांगता ! सीबीआयच्या डीएसपीचे २ लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी लुटले, फसवणुकीची तऱ्हा 'कशी' ठरली निराळी
- शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचं अमिष दाखवून 1.07 कोटींची फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरू