अमरावती- दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मालकीचा असणारा वाडा आता डॉ. पंजाबराव देशमुख याचं स्मृतिस्थळ होणार आहे. त्यासाठी बँकेच्या वतीनेच पुढाकार घेतला जातोय. एकूणच शिक्षण महर्षींचा डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंती पर्वावर त्यांचा हा वाडा आणि भाऊसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारा'ईटीव्ही भारत' चा हा स्पेशल रिपोर्ट.
माजी कृषिमंत्री तथा शिक्षणमहर्षी अशी ओळख असणारे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा अमरावती शहरात मालटेकडीलगत टोपे नगर परिसरात असणारा वाडा स्मृतीस्थळ करण्याकरिता काम सुरू आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेकडे वाडा गहाण ठेवला होता. पुढे त्यांच्या पत्नी विमलाबाई देशमुख यांनी अडचणीच्या काळात बँकेलाच वाडा विकला. दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेनं काही वर्ष या इमारतीत बँक चालवली. बँकेसाठी नवी इमारत उभारण्यात आली आहे. त्यामुळे भाऊसाहेबांचा वाडा जपण्याचा प्रयत्न बँकेच्या वतीनं करण्यात येत आहे.
असा आहे हा वाडा- देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणमंत्री असणारे डॉ. पंजाबराव देशमुख हे देश स्वतंत्र झाल्यावर देशाचे पहिले कृषिमंत्री झाले. 1958 ते 59 दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अमरावती शहरात सुमारे 33 हजार स्क्वेअर फुट जागा खरेदी करून त्या ठिकाणी दोन मजली वाडा बांधला. वाड्याच्या खालच्या मजल्यावर मोठी बैठक खोली, तीन शयन कक्षांसह छानशी स्वयंपाक खोली आणि टुमदार गॅलरी बांधली. वरच्या मजल्यावरचं बांधकामदेखील खालच्या मजल्याप्रमाणेच आहे. वरच्या मजल्यावरची बैठक खोली ऐसपैस बांधली. पूर्वी या वाड्यातून थेट मालटेकडी आणि मालटेकडी खालचा रस्ता दिसायचा. यासोबतच अमरावती मध्यवर्ती बस स्थानक आणि थेट आजचा गर्ल्स हायस्कूल चौक दिसायचा.
वाडा विकत घेताना झाला होता करार- डॉ. पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत विदर्भातील अनेक शाळा महाविद्यालय सुरळीत सुरू राहावेत या उद्देशानं आपला हा राहता वाडा दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेकडे गहाण ठेवला. 10 एप्रिल 1965 ला डॉ. पंजाबराव देशमुख यांचं निधन झालं. यानंतर या वाड्यात राहणाऱ्या त्यांच्या पत्नी विमलाबाई देशमुख यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यांनी बँकेकडे गहाण असणारा हा वाडा बँकेलाच विकला. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष देविदास बोबडे आणि माजी खासदार उषा चौधरी यांनी हा वाडा खरेदी करताना एक करार केला. "हा वाडा कधीही जमीनदोस्त केला जाणार नाही. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे स्मृतीस्थळ म्हणून इमारत कायम जपली जाईल, असा हा करार होता," अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक किशोर राऊत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. या इमारतीसमोर बँकेच्या वतीनं डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पुतळा उभारला. भाऊसाहेबांच्या जयंती निमित्त या ठिकाणी दरवर्षी सजावट करून कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
कृषी शिक्षणासाठी भाऊसाहेबांसारख्या महान व्यक्तीनं मोठे योगदान दिलं. या महान व्यक्तीच्या स्मृती या वाड्यात जपले आहेत. भाऊसाहेबांच्या स्मृती कायम राहाव्यात समाजासाठी ज्याप्रमाणे भाऊसाहेबांनी कार्य केलं. अगदी तसंच कार्य या इमारतीतून आता पुढे व्हावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत-प्रा. मनीष पाटील
भाऊसाहेबांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा- डॉ. पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची 1932 मध्ये स्थापना केली. या संस्थेतून त्यांनी विदर्भातील सर्वसामान्यांना शिक्षणाची कवाडं खुली केली. 1937 ला बटलर यांच्या मंत्रिमंडळात भाऊसाहेब शिक्षण मंत्री असताना जातीय निवारणासह कुसुमावती देशपांडे यांना केवळ त्या महिला असल्यामुळे प्राध्यापक म्हणून नाकारणे या विरोधात महत्त्वाची भूमिका बजाविली. डॉ. व्ही. बी. कोलते यांना जातीच्या आधारावर डावललं गेल्यामुळे त्यांच्यासाठी राजीनामा देण्याची तयारी भाऊसाहेबांनी दाखवली. पुढे भविष्यात डॉ. व्ही. बी. कोलते हे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले. भाऊसाहेब शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर राजकारण, समाजकारणात सक्रिय होते. जातीय निवारण तसेच अस्पृश्यता निवारणात त्यांनी भरीव योगदान दिलं. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून संविधान निर्मितीत भाऊसाहेबांनी मोठं योगदान दिलं. 1952 मध्ये देशाचे पहिले कृषिमंत्री झाल्यावर हरितक्रांतीचे त्यांनी प्रयोग केलेत. या दृष्टीनं भाऊसाहेबांचे कार्य फार मोठं होतं", असं 'युगपुरुष डॉ. पंजाबराव देशमुख' या पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना सांगितलं.
ही वास्तू देशासाठी घेतलेल्या विधायक निर्णयाची साक्षीदार- "साधारण 75 ते 80 वर्षांपूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ही वास्तू उभारली असं लक्षात येतं. कृषिमंत्री या नात्यानं भाऊसाहेब याच ठिकाणी राहायचे. कृषिमंत्री म्हणून भाऊसाहेबांनी याच इमारतीतमधून विधायक निर्णय घेतले. त्यामुळे ही वास्तू अबाधित-सुरक्षित राहावी. भाऊसाहेबांचं स्मारक या ठिकाणी व्हावं," अशी भावना प्रा.डॉ.वैभव मस्के यांनी व्यक्त केली.