ठाणे : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा फुलल्या असून फटाक्यांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे निवडणुका आणि दुसरीकडे दिवाळीचा सण यामुळं फटाक्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करणे, दिवाळी, उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या व नेत्यांच्या सभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक निकालाचा जल्लोष यामुळं यंदा फटाके विक्रेत्यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.
फटाके खरेदीसाठी लहानग्यांची गर्दी : गेल्या वर्षीच्या तुलनेत फटाक्यांच्या किमतीत 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यावरणपूरक फटाके खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचं विक्रेते विक्रेते सांगत आहेत. तर धूर करणाऱ्या फटाक्यांची मागणी यंदा घटली आहे. बाजारपेठांमध्ये फटाके खरेदीसाठी लहानग्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. दिवाळीत वर्षभर तयार होणारे फटाके मोठ्या प्रमाणात विकले जातात. शिवा काशीवरून येणाऱ्या फटाक्यांची संख्या सर्वाधिक असते, असं फटाके विक्रेते सांगतात.