नाशिक : नगर आणि नाशिक जिल्ह्यात मागील 11 महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच बिबट्यांच्या हल्ल्यात 44 जण गंभीर जखमी झाले असून 28 जण किरकोळ जखमी झाले आहेत. दिवसेंदिवस बिबटे आणि मानवातील संघर्ष वाढत असल्यानं समाज माध्यमातून चिंता व्यक्त केली जात आहे. बिबट्यांना या भागात दुसरा कोणी नैसर्गिक शत्रू नसल्यानं दिवसेंदिवस बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं सांगितलं जातंय.
नाशिकमध्ये 300 हून अधिक बिबटे? : नाशिक आणि नगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं मानवी वस्तीत येणाऱ्या बिबट्यांचा वावर आता नित्याचा झालाय. त्यामुळं मानव आणि बिबट्यांचा संघर्ष पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात नेमकी बिबट्यांची संख्या किती याबाबत वन विभागाकडं अचूक माहिती नसली, तरी 100 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पाच बिबटे आणि पाच तरस राहत असल्याचं एका संशोधनातून सांगितलं जातंय. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात 300 हून अधिक बिबटे असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. अशात वन विभागाकडून 1 जानेवारी 2024 ते 28 नोव्हेंबर 2024 या 11 महिन्याच्या कालावधीत बिबट्याच्या हल्ल्यात नाशिक आणि नगर जिल्ह्यात 19 जणांचा मृत्यू झालाय. तर 44 जण गंभीर जखमी झाले असून 28 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
वन विभागाकडून आतापर्यंत मृत व्यक्तींच्या कुटुंबांना 3 कोटींची मदत जाहीर करण्यात आलीय. तर जखमींना 23 लाख 90 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच बिबट्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, रेडा, मेंढी, बकरी अशा 5 हजार 73 जनावरांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मालकांना 4 कोटीहून अधिक अर्थसहाय्य वन विभागाकडून दिलं जातंय. 1883 चं नाशिकचं गॅझेटिअर पाहिलं की लक्षात येतं की, त्यावेळीही बिबट्यांची संख्या नाशिकमध्ये अधिक होती.
80 टक्के शुगरकेन लेपर्ड : नाशिक आणि नगर हे सधन जिल्हे म्हणून ओळखले जातात. नाशिकमध्ये कांदा, द्राक्षापाठोपाठ उसाचे क्षेत्रफळ मोठे आहे. तसेच गोदावरी, दारणासारख्या नद्या असल्यानं, या नदीच्या काठाला असलेल्या उसाच्या शेतात बिबट्याला सुरक्षित वाटते. याठिकाणी मादी बछड्यांना जन्म देते, वर्षभराहून अधिक काळ बिबट्याचं वास्तव्य इथं असते. तसंच उसाच्या बाहेर पाडताच त्यांना भक्ष्य म्हणून कुत्रे, वासरू, मांजरी, डुकरं सहज उपलब्ध होत असल्यानं, बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वनविभागाच्या एका सर्वेनुसार 80 टक्के शुगरकेन लेपर्ड नाशिक, नगर जिल्ह्यात आहेत.
बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येतील. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजूबाजूला उसाचं मोठं क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी उसाचं शेत ही सुरक्षित जागा असल्यानं बिबट्याचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्यानं, बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येतंय.
अशी घ्यावी काळजी : जिल्ह्यात उसाचं क्षेत्र मोठं असल्यानं इथं बिबट्यांना लपण्यासाठी चांगली जागा असते. ऊसतोड करताना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचं दिसून आलंय. अशात शेतकऱ्यांनी, मजुरांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी, ज्यामुळं बिबटे, लांडगे, तरस यासारखं वन्यप्राणी जवळ येणार नाहीत. अनेकवेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचं दिसून आलंय. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन वन विभागानं केलंय.
हेही वाचा -