अहिल्यानगर (अकोले) : पुणे जिल्ह्यातील मावळ प्रात समृद्ध करणारा 'इंद्रायणी भात' आता अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करतोय. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील पाडाळणे गावातील शेतकरी राम तळेकर यांच्या चार एकर क्षेत्रात तब्बल सोळा हजार किलोचं उत्पादन निघालं असून, शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबवत या परिसरातील शेतकरी हे आर्थिक सक्षम होत आहेत.
गावच करतंय इंद्रायणी भाताची शेती : "'एक गाव एक वाण' या संकल्पनेतून जिल्ह्यातील पाडाळणे गावासह परिसरातील शेतकरी आपल्या शेतात इंद्रायणी जातीच्या भाताचे उत्पादन घेत आहे. त्यामुळं पाडाळणे गावासह परिसरातील अनेक गावं ही 'इंद्रायणी तांदूळ' उत्पादनाचा हब बनली आहेत," अशी माहिती भात उत्पादक शेतकरी राममनोहर तळेकर यांनी दिली.
50 एकर क्षेत्रावर इंद्रायणी भाताची लागवड : "अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पीक आहे. तालुक्यात काळा भात, जिरा, निळा भात, इंद्रायणी अशा अनेक जातीच्या भाताची शेती येथील शेतकरी करतो. मात्र, अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील शेतकऱ्यांनी पारपरिक भाताच्या शेतीला फाटा देत 'एक गाव, एक वाण' या संकल्पनेतून सुरुवातीला 50 एकर क्षेत्रावर इंद्रायणी भाताची लागवड केली," अशी माहिती भात उत्पादक शेतकरी राजु तळेकर यांनी दिली.
इंद्रायणी भाताचं गाव : चार सूत्री पद्धतीनं शेतकऱ्यांनी भाताची लागवड केल्यानं तसेच उत्पादन दुपटीनं वाढल्यानं परिसरातील सात गावातील 2 हजार एकर क्षेत्रावर इंद्रायणी भात शेती उभी राहिली. त्यामुळं आता पाडाळणे गावाला 'इंद्रायणी भाताचं गाव' म्हणून ओळखलं जातंय. संपूर्ण गावानं इंद्रायणी या एकच वाणाच्या भाताची लागवड केल्यानं मुंबई, पुणे, नाशिक तसेच अन्य जिल्ह्यातून भाताला चांगली मागणी येत असून, उत्पादनातही वाढ झाली. आज 70 ते 80 रुपये किलो भावाने इंद्रायणी भाताला मागणी आहे. त्यामुळं आता गावातील प्रत्येक शेतकरी हा समृद्ध होऊ लागल्याची माहिती भात उत्पादक शेतकरी रामदास तळेकर यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी : "सुरूवातीला भाताची मार्केटिंग करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अनेक ग्राहकांपर्यंत पोहचलो असून, हरीषचंद्र, कळसुबाई परिसरात येणारे पर्यटक आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन भात खरेदी करत असल्यानं ग्राहकांबरोबर शेतकऱ्यांचाही फायदा होत असल्याचं दिसून येत आहे," अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
दूध उत्पादनात वाढ : भात शेतीबरोबर आता दूध उत्पादनातही पाडाळणे गावातील शेतकरी चांगले पैसा कमवत आहेत. कारण, भात काढल्यानंतर त्यातून निघणारी साळ ही जनावरांना खाद्य म्हणून वापरली जाते. त्यामुळं आता प्रत्येक शेतकरी भाताबरोबर गो पालन करून त्यातूनही चांगलं उत्पन्न घेत असल्याचं गावातील शेतकरी सांगतात.
हेही वाचा -