महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर, गोदाकाठची मंदिरं पाण्याखाली; पाहा व्हिडिओ - Nashik Godavari River Flood - NASHIK GODAVARI RIVER FLOOD

Temples in Nashik Submerge : नाशिक जिल्ह्यात पावसानं अक्षरश: थैमान घातलंय. त्यामुळं गोदावरी नदीला यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा मोठा पूर आला. परिणामी गोदाकाठावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Temples in Nashik submerge as river Godavari overflows due to incessant rains maharashtra news
गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 6:12 PM IST

नाशिक Temples in Nashik Submerge : नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळं गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पूर आलाय. गंगापूर धरणातून 8 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यानं गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणातून विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं रामकुंड परिसरातील अनेक लहान, मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळं प्रशासनाच्या वतीनं गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर (ETV Bharat Reporter)
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह दारणा, पालखेड, नांदूर मधमेश्वर धरणांतून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून 14 हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. गोदावरी काठी असलेल्या मारुतीच्या मस्तकापर्यंत पाणी पोहोचलंय. तर नांदूर मधमेश्वर धरणातून 39 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू असल्यानं जायकवाडी धरण देखील भरत आहे.
नाशिकला ऑरेंज अलर्ट : कुलाबा वेधशाळेकडून नाशिकसाठी 27 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मात्र, रविवारी (25 ऑगस्ट) वातावरणात बदल होऊ शकतो. त्यामुळं अलर्ट देखील बदलला जाऊ शकतो, असंही सांगण्यात आलंय.
आपत्कालीन परिस्थितीसाठी दूरध्वनी क्रमांक जारी :शनिवार (24 ऑगस्ट) सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळं, तसंच गंगापूर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं, असं आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. पूर बघण्यासाठी नागरिकांनी नदी किनारी गर्दी करू नये, कुठलाही धोका पत्करू नये. तसंच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 02532571872 किंवा 9607009101 या क्रमांकावर संपर्क साधावा, असंही नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details