मनमाड :-नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाचे सुहास कांदे किंवा राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्यापैकी महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र काल रात्री शिंदे गटांनी सुहास कांदे यांच्या उमेदवारी शिक्कामोर्तब केलंय. शिंदे गटाची पाहिली यादी जाहीर झाली असून, यादीत सुहास कांदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आता समीर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
देवगिरी बंगला गाठत अजित पवार यांना साकडे: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात काल अखेर सुहास कांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेची पहिली यादी जाहीर केली, या यादीत कांदे यांचा समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे कांदेंना उमेदवारी मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट देवगिरी बंगला गाठत अजित पवार यांना साकडे घातले होते. मात्र त्याचा काहीच फरक पडला नसल्याचे चित्र दिसत आहे. आता समीर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. याशिवाय आज महाविकास आघाडीचीही यादी जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, यात ते आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. नांदगाव तालुक्यातील लढाई आता अत्यंत चुरशीची होणार असून, महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.