मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून एकमत होत नसताना आणि काही जागांवर घोडं अडलं असताना दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गटानं) आपली 65 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक जणांना संधी देण्यात आली आहे तर अनेकांचं तिकीट कापलं आहे. त्यामुळं ज्यांना तिकीट मिळालं नाही, ते बंडखोरी करणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर बोलताना शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केलाय. जाहीर केलेली यादी अंतिम नसल्याचं संजय राऊत म्हणालेत.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे : या उमेदवार यादीत 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलीय. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर केलीय.
नव्या चेहऱ्यांना संधी : वरुण सरदेसाई, महेश सावंत, प्रवीणा मोरजकर, केदार दिघे, स्नेहल जगताप, समीर देसाई, सिद्धार्थ खरात, राजू शिंदे या नव्या चेहऱ्यांना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली आहे.
अधिकृत पत्रावरुन यादी जाहीर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - 2024 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानं जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आलीय. सदर यादी ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या अधिकृत पत्रावरुन जारी करण्यात आली आहे.
आघाडीत 85-85-85 जागांचं गणित पक्क : महाविकास आघाडीचीही 270 जागांवर सहमती झाल्याचं संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं. सध्या आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचं 85-85-85 जागांचं गणित पक्क केल्याचं तीनही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं. यावेळी शिवसेनेची यादी अंतिम नसल्याचं खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा