मुंबई - सत्तेच्या मोहापायी एकाच घरामध्ये दोन पक्ष निर्माण झाल्याचं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. राज्यातील प्रस्थापित नेत्यांच्या मुलांनी आपल्याला हव्या त्या पक्षातून उमेदवारीची संधी न मिळाल्याने उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षाची निवड केलीय. अखेर पक्षाशी निष्ठा महत्त्वाची नसून सत्तेची खुर्ची महत्त्वाची आहे, असं यातून प्रतिबिंबित होतं.
खुर्चीसाठी कमळ सोडून धनुष्यबाण : एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाशी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णतः गढूळ झालंय. सत्तेच्या मोहापायी कोण कुठल्या पक्षात उडी मारेल, याचा काही नेम नाही. तसेच ही उडी मारताना पक्षाची निष्ठा, तत्त्व आणि विचार यांचा काही ताळमेळ नाही. हेच चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी कुडाळ मतदारसंघातून भाजपाकडे उमेदवारी मागितली होती. विशेष म्हणजे निलेश राणे यांनाही उमेदवारी मिळावी, याकरिता नारायण राणे यांनीसुद्धा अनेक प्रयत्न केलेत. खरं तर उमेदवारीसाठीच निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून, ते धनुष्यबाण चिन्हावरून लढणार आहेत. वडील आणि खासदार नारायण राणे, तसेच भाऊ आणि आमदार नितेश राणे दोघेही भाजपामध्ये असतानासुद्धा निलेश राणे यांनी केवळ आमदारकीच्या लालसेपोटी कमळ सोडून धनुष्यबाण हाती घेतलंय.
संदीप नाईक महायुतीतून महाविकास आघाडीत : राणे कुटुंबाप्रमाणेच नवी मुंबईतसुद्धा भाजपाचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या घरातसुद्धा अशीच परिस्थिती आहे. गणेश नाईक यांचे पुत्र माजी आमदार संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. त्यांनी त्या पद्धतीने मागील वर्षभरापासून तयारीसुद्धा केली होती. गणेश नाईक यांना तशा पद्धतीचा शब्द भाजपाकडून देण्यात आल्याचंही बोललं जातंय. परंतु भाजपाने आपल्या पहिल्या यादीत बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी दिल्याने संदीप नाईक यांचा हिरमोड झालाय आणि त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत बेलापूरमधून उमेदवारीसुद्धा घेतली. आता वडील भाजपात तर मुलगा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालीय.
धनंजय महाडिकांच्या घरीही तीच परिस्थिती : राणे, नाईक यांच्या कुटुंबानंतर अशीच परिस्थिती खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबात निर्माण होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक भाजपाकडून राज्यसभेवर खासदार आहेत, तर त्यांचा मुलगा कृष्णराज महाडिक कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. परंतु ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असून, त्या जागेवर राजेश क्षीरसागर शर्यतीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर उत्तरची जागा भाजपासाठी न सोडल्यास कृष्णराज महाडिक हे धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
पक्षांतरासाठी पुतण्याला काकांच्या शुभेच्छा : भाजपा नेत्यांच्या घरामध्ये जे काही घडत आहे, तसेच चित्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येसुद्धा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि छगन भुजबळ यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. परंतु नांदगाव हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असून, सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत. अशा परिस्थितीत समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या वाटेवर असून, त्यांना नांदगावमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे समीर भुजबळ यांना नांदगावमधून निवडणूक लढण्यास खुद्द छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पक्षनिष्ठा, तत्त्व, विचार याला तिलांजली : सत्तेच्या मोहपायी एकाच पक्षात फूट पाडत कुणाचा मुलगा, कुणाचा पुतण्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहे. तसेच हे करीत असताना पक्षनिष्ठा, तत्त्व, विचार याला तिलांजली दिली जात आहे. खरं तर हे इथेच थांबणार नाही. तर या यादीत अजूनही अनेक जणांचा समावेश होणार आहे. निलेश राणे यांनी धनुष्यबाण हाती घेतलंय. तो महायुतीचाच एक भाग होऊ शकतो. परंतु संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महायुतीतून महाविकास आघाडीत उडी घेतलीय. अशात नारायण राणे, गणेश नाईक, धनंजय महाडिक, छगन भुजबळ यांच्यावर पक्षाकडून काही कारवाई केली जाते का? त्यांना कुठल्या पद्धतीची ताकीद दिली जाते का? हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा :