मुंबई : राजकारणात आल्यावर आमदार, खासदार होण्याचं ध्येय प्रत्येकाचं असतं. काही कार्यकर्त्यांना ही संधी मिळते, तर अनेकांना केवळ प्रतीक्षा करावी लागते. त्यातच, राजकीय नेत्यांच्या मुलाबाळांचाच विचार यासाठी प्राधान्यानं होत असल्यानं सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांवर मात्र, अनेकदा अन्याय होतो. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या विविध पक्षांच्या उमेदवार याद्यांवर नजर टाकली तरी यामध्ये घराणेशाहीचंच प्रतिबिंब पडल्याचं दिसून येतं.
एखाद्या कार्यकर्त्याला कठोर परिश्रम करुन, स्वत:ला सिध्द करुन उमेदवारीसाठी पात्र करावं लागतं. त्यामध्ये अनेकांची अनेक वर्षे वाया जातात. मात्र नेत्याच्या मुलाला, मुलीला, भावाला, बहिणीला, पत्नीला मात्र कोणतेही खास परिश्रम न करता ही संधी मिळते. त्यामुळं खऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, असं राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
भाजपाच्या यादीतील घराणेशाहीची उदाहरणं : भाजपानं त्यांच्या 99 उमेदवारांची यादी सर्वात प्रथम जाहीर केली. त्यामध्ये कॉंग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांना भोकरदनमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना उमेदवारी देण्यात आली. कल्याणमधून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना संधी देण्यात आली. माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आमदार आकाश फुंडकर यांच्यावर पक्षानं पुन्हा विश्वास ठेवलाय. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आमदार मेघना बोर्डीकर यांना जिंतूरमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
शेवगाव मतदारसंघातून माजी आमदार राजीव राजळे यांच्या पत्नी आमदार मोनिका राजळे यांना पक्षानं पुन्हा संधी दिली आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या स्नुषा आमदार नमिता मुंदडा यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांचे पुत्र आमदार राहुल आहेर यांना पक्षानं पुन्हा संधी दिली. माजी आमदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. पनवेलमधून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दौंड मतदारसंघातून माजी आमदार सुभाष कुल यांचे पुत्र आमदार राहुल कुल यांना पुन्हा उमेदवारी मिळालीय. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आमदार सिध्दार्थ शिरोळे यांना शिवाजीनगर मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेतही घराणेशाही : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना उमेदवारी दिलीय. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना संधी देण्यात आलीय. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांचे आमदार पुत्र योगेश कदम यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. संदीपान भुमरे यांची लोकसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानं त्यांचा मुलगा विलास भुमरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. चोपडा मतदारसंघातून विद्यमान आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एरंडोल मतदारसंघातून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल यांना उमेदवारी मिळालीय. खानापूर मतदारसंघातून माजी आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'राज' पुत्राला संधी : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. खडकवासला मतदारसंघातून माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना संधी मिळालीय.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 'यांना' दिली संधी : अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची कन्या मंत्री आदिती तटकरे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीनं विधानपरिषद सदस्य राजेश विटेकर यांची आई निर्मला विटेकर यांना पाथरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. माजी खासदार विठ्ठल तुपे यांचे चिरंजीव आमदार चेतन तुपे यांना पक्षानं पुन्हा संधी दिलीय. माजी आमदार अरुण जगताप यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप यांच्यावर पक्षानं पुन्हा विश्वास ठेवला आहे. माजी खासदार गोविंदराव निकम यांचे पुत्र आमदार शेखर निकम यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिलीय. सलग 9 वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांना नवापूर मधून उमेदवारी देण्यात आलीय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू तथा माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र आमदार इंद्रनील नाईक यांना पुसद मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय.
हेही वाचा