चंद्रपूर Sudhir Mungantiwar : " जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. अशा या वाघांच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘छावा’ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचं अनावरण करणं, हे माझं सौभाग्य आहे," अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील टपाल तिकिट अनावरण कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
तिकीटाचं अनावरण करणं सौभाग्य : शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं 12 महान व्यक्तिरेखा आणि 12 ऐतिहासिक प्रसंगावर आधारीत पोस्ट तिकिट काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "आपल्याला जेव्हा आयुष्य समजायला सुरवात होते, त्या केवळ 32 वर्षाच्या वयात छत्रपती संभाजी महाराज 120 लढाया लढले आणि जिंकलेही. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि शौर्य शब्दबद्ध करता येत नाही. जगात अनेक राजे होऊन गेले, त्या सर्वांनी आपले साम्राज्य वाढविण्यावर भर दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य चालविलं. सुर्याच्या पोटी सुर्यच जन्मतो, त्याप्रमाणं छत्रपती संभाजी महाराजांनी तत्वासाठी आपलं जीवन समर्पित केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रमाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचणं आवश्यक आहे. संभाजी महाराजांवरचे टपाल तिकीट हा केवळ एक कागदाचा तुकडा नाही, तर आपला शक्तीशाली वारसा आहे."
इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा अभ्यास करावा :पुढे मंत्री मुनंगटीवार म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सुर्याची उर्जा देणारा स्त्रोत होय. आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान झाला. तिथंच गत दोन वर्षांपासून राज्य शासनाच्यावतीनं शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचं नियोजन आहे. 4 मे रोजी वाघ नखं भारतात येत आहे. ही वाघनखं पाच ठिकाणी जाणार आहे. दिल्लीच्या जे.एन.यू. विद्यापीठात सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीनं शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
चंद्रपूर मोठं करणं आवश्यक-चंद्रपूर सतत प्रगतीच्या मार्गावर जात राहावा. राज्यातच नव्हे तर देशातील इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा अभ्यास करावा, या जिल्ह्याचं अनुकरण करावं, अशी अपेक्षा आहे. राष्ट्र महान करायचं असेल ‘जय महाराष्ट्र’ आणि महाराष्ट्र श्रेष्ठ करायचा असेल चंद्रपूर मोठं करणं आवश्यक आहे, असंही सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ हा राज्यातील 5 लाख अंध नागरिकांपर्यंत ब्रेल पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्व दिव्यांग शाळांमध्ये हा ग्रंथ पोहचविण्याचा सूचना विभागाला दिल्या आहेत. यावेळी मंत्री मुनंगटीवार यांनी प्रा. श्याम पोरेटे यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्र : गोंड समुदाय’ या पुस्तकाचं प्रकाशन केले.
हेही वाचा :
- काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; लोकसभेच्या जागेवर शिवानी वडेट्टीवारांचा दावा
- माझी जात न बघता पक्षाने मला उमेदवारी दिली; हंसराज अहीर यांचं सूचक वक्तव्य कुणासाठी?