सातारा : राज्यात सत्तासंघर्ष असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मूळ गाव गाठलं आहे. सायंकाळी हेलिकॉप्टरनं ते महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे या मूळगावी दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी बोलण्यास नकार दिला.
एकनाथ शिंदेंचा दोन दिवस मुक्काम : एकनाथ शिंदे दिल्लीहून परतल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये महत्वाच्या बैठका होणार होत्या. त्या रद्द होताच एकनाथ शिंदेंनी आपल्या गावी जायचं निश्चित केलं. दोन दिवस ते गावी मुक्कामी आले आहेत. हेलिकॉप्टरनं दरे गावातील हेलिपॅडवर त्यांचं आगमन झालं. यावेळी प्रशासनाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचं स्वागत केलं. पोलीस दलानं त्यांना सलामी दिली.
एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर चिंता : सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मीडिया एकनाथ शिंदेंना फॉलो करत महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावी पोहाचला आहे.एकनाथ शिंदेंच आगमन झाल्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी संवाद साधण्यासाठी सरसावले. मात्र, एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलण्यास साफ नकार दिला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर धीरगंभीर भाव पाहायला मिळाले.
माध्यमांशी बोलणार का? : एकनाथ शिंदे दोन दिवस दरे गावी मुक्कामी आले आहेत. त्यांनी अचानक आपल्या गावी जायचा निर्णय का घेतला? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. त्यामुळं माध्यमांचे प्रतिनिधी देखील दरे गावात पोहोचले. मात्र, एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलले नाहीत. आता उद्या तरी ते माध्यमांशी बोलणार का? याची उत्सुकता आहे.
हेही वाचा