मुंबई- निवडणूक आयोगानं मतपत्रिकेवर निवडणूक घेणार असल्याचे जाहीर केल्यास त्याच वेळी राजीनामा देण्यास तयार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंब्रा-कळवा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय. ईव्हीएमवर आक्षेप असेल तर निवडून आलेल्यांनी राजीनामे द्यावेत, असे आव्हान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेत. त्यावर आव्हाड यांनी मुनगंटीवारांना प्रतिआव्हान देत हिंमत असल्यास मतपत्रिकेवर निवडणूक घेणार असल्याचे जाहीर करा, त्याची अधिसूचना काढली तर लगेच आपण राजीनामा देऊ, असे जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
नाशिकमधील अनेक उमेदवारांना एक लाखांपेक्षा मते: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शुक्रवारी सकाळी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना भेटण्यास कमी गर्दी असल्याने मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्याचे आव्हाड म्हणाले. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी निधी देण्यात मला मदत केली नाही, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. शिंदे यांच्याकडून असलेली अपेक्षा त्यांनी पूर्ण केली नाही, असे ते म्हणाले. मुंब्रा-कळवा मतदारसंघात माझी सगळ्या बाजूंनी कोंडी करण्यात आली होती, मात्र मी लढलो आणि सुमारे एक लाख मताधिक्क्याने विजयी झालो. मी निवडणुकीत जिंकलेलो असलो तरी ईव्हीएमवर आरोप करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केलंय. सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत पाटणकरांना 90 हजार 935 मते मिळाली, तर उत्तर कराड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना 90 हजार 935 मते मिळालीत. दोन्ही उमेदवारांना समान मते कशी मिळू शकतात, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तर नाशिकमधील अनेक उमेदवारांना एक लाखांपेक्षा मते मिळाली आहेत, याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले.
...तर निवडणूक आयोगाच्या विरोधात लढा द्यावा लागेल : लोकशाही पुढील 100 वर्षे टिकवायची असेल आणि या देशाचा रशिया होऊ द्यायचा नसेल, या देशात पुतिनचा उदय होऊ द्यायचा नसेल, संविधानाने दिलेली लोकशाही टिकवायची असेल, तर लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाविरोधात लढा उभारण्याची गरज जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलीय. पाच वर्षांत पाच लाख आणि लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत 4 महिन्यात 46 लाख मते वाढली, हे कसे शक्य आहे हा निवडणूक आयोगाने केलेला खेळ आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या समितीमधून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना बाहेर घालवले गेले, तेव्हा खरे तर विरोधकांना याबाबत संशय यायला हवा होता. मात्र, विरोधकांना त्याचा संशय आला नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
हेही वाचा :