बुलढाणा : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. जनतेनं महायुतीच्या पारड्यात मतांच भरभरुन दान टाकलं आहे. निकालातून चकीत करणारे आकडे समोर आले. दरम्यान, शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.
841 मतांनी निसटता विजय : बुलढाणा मतदारसंघात यंदा दोन्ही शिवेसेनेच्या उमेदवारांमध्ये 'काटे की टक्कर' पाहायला मिळाली. मतदारसंघात कोट्यावधींची विकास कामं करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवार जयश्री शेळके यांनी तगडी लढत दिली. शेवटच्या फेरीपर्यंत आमदार संजय गायकवाड आणि जयश्री शेळके यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली अखेर संजय गायकवाड यांचा 841 मतांनी निसटता विजय झाला. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपा आमदार संजय कुटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
विरोधी उमेदवाराला मदत : "आपण एकट्यानंच विधानसभा निवडणूक लढवली, यात मित्रपक्षानंही आपल्याला मदत केली नाही. आपल्या पक्षाचे केंद्रीय मंत्री आणि आमदारांनीही आपल्या विरोधी उमेदवाराला मदत केली.' असा गौप्यस्फोट संजय गायकवाड यांनी केला. त्यांनी केलेल्या आरोपांचा व्हिडिओ समोर आला आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपांमुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहे.
संजय गायकवाड एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय : आमदार संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी आता थेट त्यांच्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यावर आरोप केला आहे. त्यामुळं आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपा आमदार संजय कुटे यांचं अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाही.
हेही वाचा