अमरावती Amravati Medical College:विभागीय शहर असणाऱ्या अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 2016 मध्ये कृती समितीच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनाला आता आठ वर्षानंतर यश मिळालं आहे. (Kiran Paturkar) अमरावती शहरातील या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाच्या वतीनं शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आलियाबाद या ठिकाणी जागा देखील निश्चित केली आहे. याविषयी अमरावती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी एकूणच संघर्षाच्या या प्रक्रिये संदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली.
430 खाटांचं उभारणार रुग्णालय :राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 28 जून 2023 रोजी अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली. अमरावती शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आलियाबाद वडद या ठिकाणी 11.129 हेक्टर ई क्लास जागा या महाविद्यालयासाठी मिळाली. या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न असणाऱ्या 430 खाटांचं रुग्णालय बांधलं जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित 430 खाटांचं हे रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय होणार आहे. या ठिकाणी सहा खाटांचं असणारं आयसीयू 20 खाटांचं करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालय परिसरात 50 खाटांचं स्त्रीरोग आणि प्रसुती वार्ड तयार केलं जाणार आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात तात्पुरते महाविद्यालय :अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मान्य झालं आहे. यावर्षी पासूनच विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि अभ्यासक्रमाला सुरुवात व्हावी यासाठी जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय परिसरात तात्पुरती सोय केली जाणार आहे. अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन वर्षाला प्रात्यक्षिक नाही. यामुळं महाविद्यालयाची अद्ययावत इमारत उभी होण्यापूर्वी दोन वर्ष या परिसरात महाविद्यालय सुरू होऊ शकतं असं किरण पातुरकर म्हणाले. या तात्पुरत्या महाविद्यालयात ज्या काही आवश्यक सुविधा आहेत त्याकरता 20 कोटी रुपयांची गरज आहे. ही रक्कम शासनानं मंजूर केली असली तरी अद्याप ती प्राप्त व्हायची आहे. 20 कोटी रकमेसह प्राध्यापकांची नियुक्ती आता तातडीनं झाली तर जुलै महिन्यात निश्चितच या ठिकाणी वैद्यकीय अभ्यासक्रमाला सुरुवात होईल, असं देखील किरण पातुरकर यांनी सांगितलं.