नरेंद्र सुर्यवंशी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीविषयी माहिती देताना कल्याण (ठाणे)Kalyan Lok Sabha constituency:लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात महायुती जाहीर करण्यात आली आणि महायुतीचं जागावाटप सुरू झाल्यावर काही जागा सोडल्या तर उमेदवारीही निश्चित झाली. अनेक दिवसांपासून भाजपानं या कल्याण मतदार संघावर दावा केला होता. म्हणून अनेक दिवस येथील उमेदवारी जाहीर होत नव्हती. काही दिवसांपूर्वी भाजपाने श्रीकांत शिंदे यांना मदत न करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्यांनी बैठक घेऊन नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला आणि वाद मिटवला. आता मुख्यमंत्र्यांचा पुत्र असलेल्या श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्यासमोर वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे अशी थेट लढत होऊन हा सामना होणार आहे.
भाजपा-शिंदे गटातील वादाचा फायदा ठाकरे गटाला :कल्याण लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा येत असून त्यापैकी 3 मतदारसंघ भाजपाचे आहेत. त्यात गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), रवींद्र चव्हाण (डोंबिवली), कुमार अयलानी (उल्हासनगर) असे आमदार आहेत. तर राजू पाटील कल्याण ग्रामीण मधून मनसेचे तर शरद पवार राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्राचे आमदार आहेत. तसंच शिंदे गटाचे एकमेव आमदार डॉ. बालाजी किणीकर हे अंबरनाथमधून आमदार आहेत. एकंदरीतच या मतदारसंघात भाजपाची सर्वाधिक राजकीय ताकद असल्याने भाजपानेही या मतदार संघावर दावा केला. गेल्या काही महिन्यांपासून भाजपा-शिंदे गटात सुरू असलेल्या वादाचा उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांचे खासदार श्रीकांत शिंदे विरोधात कल्याण ग्रामीण मधील नागरी विकास कामांवरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे.
मागील वर्षी भावी खासदार म्हणून कापला केक :गेल्याच वर्षी मनसेचे आमदार राजू पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलंच वाक्युद्ध रंगल होतं. गेल्या वाढदिवशी आमदार राजू पाटील यांनी भावी खासदार लिहिलेला केक कापला. इतकंच नाही तर राज ठाकरे यांनी आदेश दिल्यास आपण कल्याण लोकसभा लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही राजू पाटलांच्या आव्हानाला उत्तर देताना आजीच्या पुढे माजी लागायला नको याची काळजी घ्या, असा टोला लगावला होता. त्यावर आमदार राजू पाटलांनीही ट्विट करत खासदार श्रीकांत शिंदे यांना चांगलंच डिवचलंय. “बापाने पॉकेट मनी म्हणून एमएमआरडीए, एमएसआरडीसीचा निधी दिला म्हणून करोडोच्या बाता? कामाने उत्तर दिले असते तर समस्या उरल्याच नसत्या. रेल्वेच्या प्रवाश्यांना रोज मरणयातना भोगाव्या लागल्या नसत्या”, असं राजू पाटील यांनी ट्विट केलं होतं.
कामाच्या श्रेयावरून आव्हाड-शिंदेंमध्ये वाद :कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांची मजबूत पकड आहे. या परिसरातून नेहमीच आघाडीला भरभरून मतदान पडले आहे. येथील नागरी कामाच्या श्रेयामुळे आव्हाड-श्रीकांत शिंदेंमध्ये कुरघोडीचे राजकारण झाल्याचं पाहावयास मिळत आहे. श्रीकांत शिंदे आणि आव्हाड यांच्यात अनेकदा झालेले वादही पाहायला मिळाले आहेत. त्यावर मुख्यमंत्रीही श्रीकांत शिंदे यांना समजावताना दिसले होते. एकंदरीत सहा विधानसभांपैकी शिंदे गटाचा एकमेव आमदार अंबरनाथ मधून आहे; मात्र याही मतदार संघात शिंदे गट भाजपामध्ये काही प्रमाणात नाराज झाल्याने याचा फटका डॉ. श्रीकांत शिंदेंना बसण्याची शक्यता आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर केलेली असली तरी पुढील लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत श्रीकांत शिंदे यांची वाट खडतर आहे, हे मात्र नक्की.
हेही वाचा :
- कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ 'डॅडी' कायमचा सुटणार, न्यायालयानं सरकारला दिले 'हे' निर्देश - Arun Gawali
- "बारामतीची लढाई ही शरद पवार, अजित पवारांची नाही, तर..."; बारामतीबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnvis
- आमदार रवी राणांपेक्षा त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा दुप्पट श्रीमंत! - Navneet Rana Property