ठाणे : भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळीला प्रकृती अस्वस्थतेमुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
विनोद कांबळीवर मोफत उपचार : आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते आहेत. त्यांनी विनोद कांबळीचे अनेक सामने पाहिले आहेत. सोशल मीडियावर कांबळीच्या प्रकृती अस्वस्थतेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी भावनिक होत मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तत्काळ कांबळीला रुग्णालयात दाखल करून घेतलं.
“विनोद कांबळी हे भारतासाठी योगदान देणारे महान खेळाडू आहेत. त्यांना मदतीची गरज असल्याचं पाहून मी त्यांना सहकार्य करणं हे माझे कर्तव्य मानलं,”. - शैलेश ठाकूर, संचालक, आकृती रुग्णालय
“माझी प्रकृती सुधारत आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळं मला बळ मिळालं आहे.” - विनोद कांबळी, माजी क्रिकेटपटू
शैलेश ठाकूर यांच्या निर्णयाचं कौतुक : सध्या तीन डॉक्टरांची टीम विनोद कांबळीवर उपचार करत असून त्याची प्रकृती नियंत्रणात आहे. क्रिकेटप्रेमींनी विनोद लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शैलेश ठाकूर यांचा दयाळूपणा आणि माजी खेळाडूबद्दलची आस्था यामुळं भिवंडीत क्रिकेट प्रेमींच्या मनात त्यांच्या निर्णयाचं कौतुक होत आहे.
याआधीही खालावली होती प्रकृती : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा एक व्हिडिओ 10 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत विनोद कांबळीला चालताना त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. चालण्यासाठी दोन व्यक्ती त्याच्या हाताला धरून मदत करत होते. आपल्या दमदार फलंदाजीनं गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या विनोदची अशी अवस्था पाहून क्रिकेट चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात होती.
हेही वाचा -
- व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला "मी अजूनही बॅटिंग करु शकतो" - Vinod Kambli Video
- कोण होतास तू, काय झालास तू; विनोद कांबळीचा व्हिडिओ पाहून हळहळले चाहते, सचिनला केलं मदतीचं आवाहन - Vinod Kambli Video
- Vinod Kambli Net Worth कोट्यावधी कमावणारा विनोद कांबळी आज एक-एक रुपयाला झाला आहे महाग, जाणून घ्या काय आहे कारण