पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्रिपद न दिल्यानं नाराज झालेल्या छगन भुजबळांनी अजित पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नाराज भुजबळ यांच्याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, हा आमच्या पार्टीचा अंतर्गत विषय आहे. तो आमचा आम्ही सोडवू.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय येथे विविध विषयांवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
यावेळी अजित पवार म्हणाले की, शहरातील विविध विषयांवर आज बैठक घेण्यात आली. शहरातील ट्रॅफीक समस्येवर १५ दिवसांनी बैठक घेणार आहे. पुणेकरांना ट्रॅफीक समस्येला सामोरं जावं लागत आहे. त्यावर सर्व विभागांची बैठक आयोजीत केली आहे. तसंच केईम रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी जागा सोडायची तयारी दर्शवली आहे. त्यांना महापालिका दुसरीकडे जागा उपलब्ध करुन देईल अशा विविध विषयावर बैठक घेण्यात आली आहे.
भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ते भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, हा आमच्या पक्षाचा विषय असून तो आम्ही सोडवू असं यावेळी अजित पवार म्हणाले.
आज पुण्यातील वाघोली येथे झालेल्या अपघाताबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, वाघोली अपघात स्थळी मी भेट देणार आहे. मी अपघाताची माहिती घेतली आहे. कारवाईच्या सूचना देखील दिल्या आहेत.
हेही वाचा..