पुणे Society Bouncers Pune : 'पुणे तिथं काय उणे' हे नेहमीच म्हटलं जातं. याची प्रचितीही वेळोवेळी विविध माध्यमातून येतच असते. अशातच पुण्यातील 58 वर्ष जुनी असलेली डीपी रस्त्यावरील नामांकित सोसायटीनं सोसायटीच्या जागेत खवय्यांच्या होत असलेल्या अतिक्रमणामुळं एक मोठा निर्णय घेतलाय. चक्क सोसायटीच्या मोकळ्या जागेवरच बाऊन्सर नेमले (Pune Food Stall Bouncers) आहेत. त्यामुळं सोसायटीत असलेल्या हॉटेलमधून चहा, कॉफी तसेच विविध खाद्य पदार्थ घेणाऱ्या ग्राहकांना महिला बाऊन्सरचा सामना करावा लागत आहे.
बाऊन्सर ठेवण्याची पहिलीच घटना :सिंहगड रस्त्याजवळील डीपी रोडवर 35 एकरमध्ये 277 बंगले असलेली 'नवसह्याद्री सहकारी गृहनिर्माण' ही नामांकित सोसायटी आहे. या सोसायटीत काही दुकानं हे भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत. यात काही उपहारगृह, काही छोटे हॉटेल्स आणि पोस्ट ऑफिस भाड्यानं देण्यात आली आहेत. तरीही सोसायटीच्या मोकळ्या जागेवर या दुकानदारांनी अतिक्रमण केली आहेत. या ठिकाणी खवय्यांचीही गर्दी होत असल्यानं सोसायटीतील सभासदांना त्रास होऊ लागला आहे. याबाबत सोसायटीतील सभासदांनी मीटिंग घेत मोकळ्या जागेतील अतिक्रमण काढून चक्क बाऊन्सरच नेमले आहेत. यामुळं दुकानदार आणि सोसायटीतील वादाचा फटका ग्राहकांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शहरात सोसायटीच्या मोकळ्या जागेत बाऊन्सर ठेवण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे.
दुकानदारांना नोटीस :'नवसह्याद्री सोसायटी'नं आपल्या जागेत सहा दुकानं सोसायटीच्या सभासदांना दीर्घमुदतीच्या भाडेतत्त्वावर दिली आहेत. यापैकी एका दुकानात हॉटेल असून, तिथे विविध खाद्य पदार्थ विकले जातात. हे खाद्य पदार्थ खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दुकानांसमोरच्या मोकळ्या जागेतच नागरिक या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत असतात. तसंच या दुकानात आलेल्या नागरिकांकडून रस्त्यावरच वाहनेदेखील लावली जातात. याचा त्रास सोसायटीतील लोकांना होत असल्याच्या अनेक तक्रारी सोसायटीकडं आल्या होत्या. या तक्रारींनंतर सोसायटीच्या माध्यमातून या दुकानदारांना तीन ते चार वेळा नोटीस देखील पाठवण्यात आली. मात्र, कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्यानं महापालिकेला सांगून सोसायटीनं या दुकानदारांनी केलेलं अतिक्रमण काढून टाकलं. तसंच तिथं बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. या बाऊन्सरच्या माध्यमातून ह़ॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सोसायटीच्या जागेत थांबून दिलं जातं नाही. त्यामुळं ग्राहक आणि बाऊन्सर यांच्यात अनेकवेळा वाद होत आहेत. याचा फटका हा ग्राहकांसोबतच हॉटेल मालकांनाही बसत आहे.