कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे आयोजित उपक्रमाविषयी सांगताना कोरडे दाम्पत्य छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Shriram Name With Laddu:अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे निर्माण पूर्ण झाले असून २२ जानेवारी रोजी प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. त्याचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा केला जातोय. संभाजीनगर येथील सिडको भागातील कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे अनोख्या पद्धतीनं उत्सवाला सुरुवात करण्यात आली. (Ayodhya Ram Temple) ११ हजार बुंदी लाडूच्या माध्यमातून 'श्रीराम' असं लिहून प्रसाद अर्पण करण्यात आला. हा प्रसाद पुढील दोन दिवस रथातून भक्तांना वाटप केला जाईल. तर रांगोळीच्या माध्यमातून मंदिराची मोठी प्रतिकृती साकारण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी दिली.
10 किलो फुलांची आकर्षक सजावट:सिडको येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे राम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त जवळपास 25 हजार लाडू तयार केले आहेत. बुंदीच्या लाडूंचा प्रसाद तयार करण्यात आला असून शनिवारी सकाळी लाडवांच्या माध्यमातून 'श्रीराम' असे लिहून प्रसाद दाखवण्यात आला. 35 कामगारांनी तीन दिवस काम करत बुंदी लाडू तयार केले. पंचवीस बाय चाळीस फुटी स्टेजवर बुंदीच्या लाडूने श्रीराम नाव साकारण्यात आले. यासाठी 15 मोठ्या पराती, 500 स्टील ताट, तीनशे वाट्या वापरण्यात आल्या आहेत. दहा किलो फुलांची सजावट तयार करण्यात आलेली आहे.
श्रीराम बँड रथाची निर्मिती:हे लाडू रविवारी आणि सोमवारी प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे. श्रीराम बँड रथ तयार करण्यात येत असून या रथावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची ७ फुटी प्रतिमा, श्रीरामाची ५ फुटी मूर्ती तसेच २० बाय १० फुट उंच भव्य मंदिर, लाइटिंग आणि पुष्पहाराने सजवण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष विलास कोरडे यांनी दिली.
रांगोळीतून साकारले मंदिर:कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे विविध देखावे नेहमी सादर केले जातात. राम मंदिर निर्माण कार्य पूर्ण झाल्याच्या आनंददायी क्षणी रांगोळीच्या माध्यमातून राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. २० बाय १० फूट प्लायवर फेविकॉलच्या साहय्याने रांगोळी चिटकवून हे मंदिर साकारण्यात आले. जवळपास तीन दिवस त्यासाठी लागले आहेत. पन्नास किलो रांगोळी आणि पाच किलो फेविकॉल वापरण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली. यासाठी चंद्रमुनी जायभाय, ज्ञानेश्वर सागरे, अनिल गावंडे, प्रल्हाद गायकवाड, संजय राठोड, मनोज तोडावत, दीपाली अस्वार, आचारी गौतम महाराज यांनी मेहनत घेतली आहे. कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे दहा हजार लाडू ग्रामीण भागात वाटप होणार आहे. यासाठी मनोज तोडावत सहकार्य करणार आहेत.
हेही वाचा:
- मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीचा उपमुख्यमंत्र्यांना धसका; वेगळ्या वैद्यकीय कक्षाची स्थापना
- सचिन, विराट, विश्वनाथन आनंद; रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेला कोणकोणते खेळाडू येणार? जाणून घ्या संपूर्ण यादी
- एकीसोबत 'संबंध' तर दुसरीसोबत लग्नाची बोलणी, भारतीय हवाई दल कर्मचाऱ्याचा कारनामा