नाशिक Trimbakeshwar Darshan in Shravan 2024 : श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात विविध भागातून मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात. यामुळं मंदिरात श्रावण महिन्यात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. दर्शनासाठी आता मंदिर पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. तसंच प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे चार वाजता भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांना रहिवाशी पुरावा दाखवल्यावर विशिष्ट वेळेत उत्तर दरवाज्यातून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष नियोजन मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. अशात राज्यभरातून भाविक या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त पहाटेपासूनच मंदिरात महापूजा, अभिषेक, आरती आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. मंदिराच्या उत्तर दरवाज्यातून दोनशे रुपये देणगी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. देणगी दर्शनासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो तर मोफत दर्शनासाठी जवळपास सात ते आठ तासांचा वेळ लागतो. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळं भाविकांचे हाल होणार नाही, यासाठी मंदिर प्रशासनानं नियोजन करावं, अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली.
व्हीआयपी दर्शन : शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना पूर्वनियोजित लेखी प्रोटोकॉल असल्याशिवाय व्हीआयपी दर्शन दिलं जाणार नाही. या व्यवस्थेत ऐनवेळी बदल करण्यात येऊ शकतो, असे मंदिर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.