मुंबई - शिवजयंती हा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करण्याचा एक विशेष दिवस आहे. आज 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात वेगवेळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांना शौर्य आणि नेतृत्वासाठी ओळखले जाते. महाराज फक्त एक निर्भय योद्धा नव्हते तर मराठा साम्राज्याची स्थापना करणारे एक दूरदर्शी महान नेते होते. युद्धभूमीशिवाय त्यांना प्रशासनाची खूप काळजी होती. आज आम्ही या विशेष दिवशी त्याच्यावर आधारित असलेल्या चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
1 'शेर शिवराज' : 'शेर शिवराज' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असलेला अफझलखानचा सामना करतात आणि प्रतापगडाच्या लढाईत विजयी होतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. 'शेर शिवराज' चित्रपटाचे निर्माते दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, नितीन केणी, प्रद्योट पेंढारकर आणि नवीन चंद्रा हे आहेत. या चित्रपटानं जवळपास 10 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, दीप्ती धोत्रे, मुकेश ऋषी, अजय पुरकर आणि अलका कुबल या स्टार्सनं काम केलं आहेत.
2 'हर हर महादेव' : 'हर हर महादेव' हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022मध्ये प्रदर्शित झाला होता. हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये सुबोध भावे, शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बाजी प्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली फक्त 300 सैनिक 12000 मुघल सैनिकांविरुद्ध लढतात आणि विजयी होतात. या युद्धात मावळ्यांना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागते.'हर हर महादेव' चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलंय. या चित्रपटाचं बजेट 10 कोटीचं होतं. 'हर हर महादेव' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 25 कोटीची कमाई केली होती.
3 'फत्तेशिकस्त' : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2019मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती प्रतीक औदिच्य यांनी केली होती. 'फत्तेशिकस्त'मध्ये शाइस्ता खानचा पुण्यात अत्याचार वाढला होता, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हल्ला करण्याची योजना आखतात असं यात दाखविलं गेलं आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकरली आहे. तसेच चिन्मय मांडलेकर व्यतिरिक्त या चित्रपटात समीर धर्माधिकारी, तृप्ती तोरडमल, अंकित मोहन, अनुप सोनी आणि मृणाल कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
4 'सिंहगड' : 'सिंहगड' चित्रपट 1933 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीनं केली होती. 'सिंहगड' चित्रपटाची कहाणी हरी नारायण आपटे यांच्या 'गड आला पण सिंह गेला' या साहित्यिक क्लासिक कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर , कमलादेवी, जी.आर. माने, रहीम मियाँ आणि केशवराव धायबर या कलाकारांनी काम केलं आहेत.
5 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' : 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा 2009 चा मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि अश्वमी मांजरेकर यांनी केली आहे. संतोष रामदास मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सुचित्रा बांदेकर, अभिजीत केळकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रिया बापट आणि मेधा मांजरेकर हे स्टार्स आहेत. या चित्रपटामध्ये समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढणाऱ्या एक व्यक्ती कहाणी दाखविण्यात आली आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'ला सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.