मुंबई- टोरेस गुंतवणूक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. टोरेस घोटाळा प्रकरणातील फरार आरोपींनी बल्गेरियातही अशाच प्रकारच्या गुंतवणूक योजना सुरू केली असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. टोरेस फसवणूक प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून, तर नऊ जण फरार आहेत. यातील आठ जण युक्रेनचे आणि एक जण तुर्कीचा रहिवासी आहे. घोटाळ्याचा तपास करताना आरोपींनी 12,783 गुंतवणूकदारांना 130 कोटी रुपयांना फसवल्याचे समोर आलंय.
फरार आरोपींकडून गुंतवणूक योजनेच्या नावाखाली बल्गेरियातही फसवणूक : आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) कर्मचारी आता बल्गेरियात फरार आरोपींनी वेगळ्या कंपनीच्या नावाखाली सुरू केलेल्या गुंतवणूक योजनांची चौकशी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. "माहितीची खातरजमा झाल्यानंतर ती अधिकृत माध्यमाद्वारे बल्गेरियातील कायदा अंमलबजावणी संस्थांबरोबर शेअर केली जाणार आहे," अशीही माहिती त्यांनी दिलीय. टोरेस गुंतवणूक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने 35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलीय, ज्यामध्ये रोख रक्कमदेखील समाविष्ट आहे.
कार, फर्निचर, इलेक्ट्रिकल उपकरणांचा लिलाव करण्याची मागणी : तपास करणाऱ्या यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने वापरलेल्या कार, फर्निचर, इलेक्ट्रिकल उपकरणांचा लिलाव करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागितल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलंय. "जर या गोष्टी सुरळीत पार पडल्या तर गुंतवणूकदारांचे सुमारे 40 कोटी रुपये परत मिळू शकतात," असंही त्यांनी अधोरेखित केलंय. टोरेस ज्वेलरी ब्रँडचे मालक प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडवर पॉन्झी आणि मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनांच्या आमिषानं गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आश्वासन देऊन या कंपनीनं अनेकांना गंडा घातला आहे.
प्रकरणाच्या तपासाला एक नवीन वळण : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला टोरेस गुंतवणूक फसवणूक प्रकरणात महत्त्वाची माहिती मिळाली आहे, ज्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला एक नवीन वळण लागलंय. फरार आरोपींना पकडण्यासाठी आणि फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून देण्यासाठी तपास यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. जर या प्रकरणात आणखी माहिती मिळाली तर ते एक मोठे कायदेशीर प्रकरण बनू शकते, असंही पोलिसांनी सांगितलंय.
हेही वाचाः