महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मविआतील नेते मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून, मविआच्या पत्रकार परिषदेवरून शिंदे गटाची खोचक टीका - Kiran Pavaskar Criticism MVA - KIRAN PAVASKAR CRITICISM MVA

Kiran Pavaskar Criticism MVA : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज (15 जून) रोजी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान मविआतील प्रत्येक पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ दिसून आली. यावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे सचिव किरण पावसकर यांनी मविआतील नेते मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, अशी खोचक टीका केली.

Kiran Pavaskar Criticism MVA
किरण पावसकर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 10:56 PM IST

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आतापासूनच रणनीती आखली जात असून, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्याकडून वेगवेगळे वक्तव्य येत आहेत. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. महाविकास आघाडीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असून, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही परिवर्तन दिसून येईल, असं मविआतील नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान, मविआतील आजच्या पत्रकार परिषदेवरून शिवसेना (शिंदे गट) सचिव आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी खोचक टीका केली आहे.

जनतेच्या प्रश्नासाठी नाही तर सत्तेसाठी एकत्र :पुढे बोलताना किरण पावसकर म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला एम फॅक्टरने मतदान केले. त्यामुळे त्यांचे खासदार निवडून आले आणि महाविकास आघाडीत ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांना लोकांच्या प्रश्नांचे, सामान्यांच्या समस्यांचे काही पडले नाही. हे तिन्ही पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. यांना सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही बांधिलकी नाही. तसेच मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही पक्षाकडून दावा करण्यात येत आहे. ठाकरे गटातून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील असं बोललं जातंय. काँग्रेसमधूनही आपला मुख्यमंत्री होईल असं सांगण्यात येत आहे. तर शरद पवार गटातून जयंत पाटील हे अनुभवी असून, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार जयंत पाटील असू शकतात, असं सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी मविआतील नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याची बोचरी टीका शिवसेना शिंदे गट सचिव आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी केली.

तीन तिघाडी... काम बिघाडी :महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षाचे म्हणजे तीन तिघाडी आणि काम बिघाडी आहे, अशी परिस्थिती आहे. अजून विधानसभा निवडणुकीला चार महिन्याचा अवधी असताना आता पासूनच जागा वाटपावरून यांच्यात वेगवेगळी वक्तव्य आणि दावे करण्यात येत आहेत. ठाकरे गटाने 200 जागा लढवणार असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे यांच्यात जागा वाटपावरूनच तीन तिघाडी आणि काम बिघाडी अशी परिस्थिती निर्माण होईल आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत हे एकत्र राहतील की नाही यात पण शंका आहे, असं किरण पावसकर यांनी म्हणत महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली.

ना घर का..., ना घाट का :महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाची ना घर का... ना घाट का अशी अवस्था झाली आहे. शरद पवार गट आणि काँग्रेस मिळून उबाटा गटाला रस्त्यावर आणणार आहेत. उबाटा गटाचा गेम करणार आहेत, असेही पावसकर म्हणाले. 2019 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री केले. चार चार खाती दिली. पण आता मुलगा बापासाठी बॅटिंग करत आहे आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला जात आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्येच विसंवाद दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत उबाटा गटाने 21 उमेदवार दिले होते. त्यापैकी 11 उमेदवार हे बाहेरून पक्षातून आलेले होते. आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडे वीस उमेदवार देखील नसतील, असं पावसकर म्हणाले. दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांना आतापासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत. त्यामुळे ही महाविकास आघाडी नसून महाभकास आघाडी आहे, असा हल्लाबोल किरण पावसकर यांनी महाविकास आघाडीवर केला.

हेही वाचा:

  1. अजित पवार भाजपासाठी 'नाकापेक्षा मोती जड'; पवारांना बाजूला कसं सारायचं? भाजपासमोर प्रश्न - Ajit Pawar
  2. ठरलं! विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार; बंडखोरांबाबत घेतला मोठा निर्णय - Mahavikas Aghadi PC
  3. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची तत्काळ मुक्तता करावी; मुंबई उच्च न्यायालयात याचिका - Porsche Car Accident Case

ABOUT THE AUTHOR

...view details