महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुस्तीत पंचांना देवाचा दर्जा, लाथ मारणं निंदनीय; कुस्ती पंढरी कोल्हापुरात उमटला नाराजीचा सूर - MAHARASHTRA KESARI

महाराष्ट्र केसरीच्या सामन्यात शिवराज राक्षेने केलेल्या कृतीबद्दल कोल्हापुरातील कुस्तीपटू, कुस्ती शौकिनांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी या घटनेचा निषेध केला.

MAHARASHTRA KESARI
कुस्तीपटू शिवराज राक्षे (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2025, 8:05 PM IST

Updated : Feb 3, 2025, 8:36 PM IST

कोल्हापूर :राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं अहिल्यानगर इथल्या वाडिया मैदानावर रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्र केसरी किताबासाठी पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या लढतीत पंचांनी चुकीचा निर्णय दिला असा आरोप करत शिवराज राक्षे यांनं पंचांशी हुज्जत घालत लाथ मारल्याचा धक्कादायक घडला. "कुस्ती पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात याप्रकरणी आजी-माजी कुस्तीपटू आणि कुस्ती शौकिनांनी राक्षे याच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत कुस्तीत असा प्रकार निंदनीय असल्याचं सांगितलं. "यावेळी शिवराज राक्षेला माफी मागण्याची संधी होती. मात्र, शिवराज राक्षेनं माफी न मागता पंचांशी केलेलं वर्तन कुस्ती क्षेत्राच्या नावलौकिकाला न शोभणारं आहे." असं मत हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केलं.

शिवराज राक्षेच्या कृतीवर आक्षेप :महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेल्या वादाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. मल्लविद्याचं माहेरघर असलेल्या कोल्हापुरातील आजी-माजी पैलवान आणि कुस्ती शौकिनांनीही डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्या कृतीवर आक्षेप घेत कुस्ती खेळात पंचांना देवाचा दर्जा आहे त्यांना लाथ मारणे, हा प्रकार लाजिरवाना असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. १९७२ साली हिंदकेसरीची गदा आपल्या नावावर करणाऱ्या दीनानाथ सिंग यांनी नाराजी व्यक्त केली. "आम्हीही देशातील अनेक कुस्ती आखाड्यात देश आणि देशा बाहेरील मल्लांसोबत कुस्त्या खेळल्या. मैदानात पैलवानांसाठी पंच हा देव असतो. पंचांनी दिलेला निर्णय मान्य नाही, म्हणून त्यांना लाथ मारणं हे महापाप आहे. राक्षेनं केलेला प्रकार कुस्ती क्षेत्राला भूषणावह नाही. शिवराज राक्षे याच्याकडं माफी मागण्याची संधी होती. मात्र, त्यांन माफी मागितली नाही हे दुर्दैवी आहे. कुस्ती स्पर्धे दरम्यान असे प्रकार घडू नयेत यासाठी नियमांची कडक पुनर्बांधणी व्हावी" अशी अपेक्षाही हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी व्यक्त केली.

ईटीव्ही भारतशी बोलताना हिंद केसरी पैलवान दिनानाथ सिंग (ETV Bharat Reporter)

तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे होता :"शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या कुस्ती खेळात एखाद्या वेळेस पैलवानांचा तोल सुटतो. परंतु, सामन्या दरम्यान संयम ठेवणं महत्त्वाचं असतं. मात्र, या सामन्यात तसं झालं नाही. मोठा स्पर्धांमध्ये निर्णयाबाबत गोंधळ होऊ शकतो. तंत्रज्ञानाचा वापर करून सामना प्रमुख, मैदानावरील पंचांनी एकत्र चर्चा करून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. मात्र, तसं झालं नाही तसंच डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनाही खेळाडू वृत्ती दाखवायला हवी होती. पंचांचा एक निर्णय कोणावर अन्याय करणारा नसावा या सामन्यात दोन्ही बाजूची चूक दिसत आहे." असं मत राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते कुस्ती प्रशिक्षक राम सारंग यांनी व्यक्त केलं.

कुस्ती आखाडा प्रमुखांकडं दाद मागायला पाहिजे होती :सामन्यात मैदानावरील तिन्ही पंचांनी चितपट कुस्तीचा निकाल दिल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवराज राक्षेने कुस्तीआखाडा प्रमुखकांकडं दाद मागायला हवी होती. मात्र, त्यानं तसं न करता आक्रमक भूमिका घेत पंचांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याचं कोणीही समर्थन करत नाही. चितपट कुस्तीला आव्हान देता येत नाही, सामन्यातील पंचांनी योग्य भूमिका बजावली, खेळाडूंनी पंचांचा सन्मान करायला हवा अस मत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पंच संभाजी पाटील-कोपर्डेकर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

  1. नाळ चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांची 'मेळघाट सफारी'; म्हणाले पुढच्या सिनेमाचं शूट मेळघाटात करण्याचा विचार
  2. "शिवराज राक्षेनं पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या"; पैलवान चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य
  3. नागपुरात तरुणाची निर्घृण हत्या, आरोपी अटकेत
Last Updated : Feb 3, 2025, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details