मुंबई - महाविकास आघाडीने काल संयुक्त पत्रकार परिषद घेत प्रत्येकी ८५ जागांचं वाटप केलंय. अशात आता शिवसेना १०० जागा लढणार, त्याकरिता दोन षटकार लगावणार, असा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्याचबरोबर ज्यांना उमेदवारी दिली गेली नाही, त्यांची सरकार स्थापनेनंतर योग्य ती भरपाई केली जाईल, असं सांगत बंडोबांना शांत करण्याचं कामसुद्धा संजय राऊत यांनी केलंय, मुंबईत ते बोलत होते.
शेवटच्या क्षणीही बदलले जाऊ शकतात उमेदवार: याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी २८८ जागांवर निवडणूक लढणार याबाबत कुठलीही शंका नाही, काल आम्ही तिन्ही पक्षांनी प्रत्येकी ८५ जागांवर उमेदवारांची घोषणा केलीय. उर्वरित जागेवर आज सायंकाळपर्यंत निर्णय होईल. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, आता जास्त घोळ घालून चालणार नाही. अगदी शेवटच्या क्षणीही उमेदवार बदलले जाऊ शकतात. तुम्ही आमच्या बेरजेवर जाऊ नका, महाराष्ट्रात आम्ही १७५ जागा जिंकू हीच आमची बेरीज आहे, असंही ते म्हणालेत.
सेंचुरी मारायला अजून २५ ओव्हर बाकी :महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना १०० जागा घेईल, अशी अपेक्षा आहे. आता त्यांच्याकडे ८५ जागा असून, १०० जागांसाठी अजून त्यांना १५ जागांची गरज आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही आता ८५ जागा घेतल्यात. सेंचुरी मारायला आम्हाला दोन षटकारांची गरज आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. आम्ही सेंचुरी मारणार कारण अजून २५ ओव्हर बाकी आहेत, तर दुसरीकडे राज्यातील एकूण २८८ जागांपैकी महाविकास आघाडीत आतापर्यंत प्रत्येकी ८५ अशा २५५ जागांचं वाटप झालं असून, उर्वरित ३३ जागांपैकी १८ जागा मित्र पक्षांना सोडण्याची तयारी दर्शवलीय. अशात उरलेल्या १५ जागा कुणाच्या पदरात किती जागा येतात, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही काँग्रेस १०० जागा लढवेल, असा दावा केला असल्याने शिवसेना १०० कशी गाठणार हा सुद्धा प्रश्न आहे.